मुंबई : त्याने अनेक वर्षांपासून टीम इंडियाची जर्सी परिधान करण्याच स्वप्न पाहिलं होतं. अखेर ते स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. एक यशस्वी क्रिकेटपटू बनण्यासाठी त्याने खूप मेहनत केलीय. कठीण परिस्थितीमुळे वाटेत अनेक अडथळे आले, पण त्याने त्यावर मात केली. कठोर ट्रेनिंग, मेहनतीमुळे अखेर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया 5 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. रवींद्र जाडेजा, सुनील गावस्कर आणि रोहित शर्मा यांना त्याच्यामध्ये टीम इंडियाच भविष्य दिसलं होतं. मागच्या दोन IPL मध्ये या प्लेयरने स्वत:ला सिद्ध केलय.
IPL 2023 च्या सीजनमध्ये इतक्या धावा केल्या?
आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय, त्याचं नाव आहे तिलक वर्मा. IPL मध्ये तिलक वर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळतो. IPL 2023 च्या सीजनमध्ये तिलक वर्माने 343 धावा केल्या. वयाच्या 11 व्या वर्षापासून तिलकच्या प्रवासाला सुरुवात झाली. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये तिलक वर्माने 164.11 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली.
एका संध्याकाळी मित्रांसोबत खेळताना पाहिलं
सर्वप्रथम कोच बायश यांनी तिलकमधील प्रतिभा हेरली होती. एका संध्याकाळी बायश यांनी तिलकला मित्रांसोबत टेनिस क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. त्यानंतर त्याची माहिती काढली. इंडियन एक्सप्रेसनुसार, कोच बायश तिलकच्या वडिलांना जाऊन भेटले. मुलाला क्रिकेट अकादमीत पाठवण्यासाठी त्यांनी विनंती केली.
घरापासून क्रिकेट अकादमी 40 किलोमीटर लांब
तिलकचे वडिल पेशाने इलेक्ट्रीशियन होते. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मुलाचा क्रिकेटचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यानंतर कोचने तिलकची जबाबदारी घेतली. ते दररोज घरी येऊन तिलकला घेऊन जायचे. नंतर पुन्हा त्याला घरी आणून सोडायचे. कोचने त्याची फि माफ केली होती. क्रिकेट अकादमी तिलकच्या घरापासून 40 किलोमीटर अंतरावर होती. हा सर्व प्रवास खडतर होता. तिलक सुद्धा ट्रेनिंगचा एकही दिवस मिस होणार नाही, याची काळजी घ्यायचा.
बाईकवरच झोपून जायचा
कोच सलाम बायश आपल्या बाईकवरुन तिलकला अकदामीत घेऊन जायचे. सकाळी 5 वाजता ते तिलकच्या घरी जायचे. बऱ्याचदा तिलकच्या डोळ्यांवर झोप असायची. अनेकदा तो बाईकवरच झोपून जायचा. काहीवेळा त्यांनी बाईक थांबवून तिलकला झोपेतून उठवलय.
उधारीच्या बॅटने पहिली सेंच्युरी
वर्षभरानंतर कोचने तिलकच्या वडिलांना क्रिकेट अकदामीच्या जवळच घर बघायला सांगितलं. सुदैवाने त्यांना क्रिकेट अकादमीजवळच नोकरी मिळाली. तिलकने आपल्या करिअरमध्ये पहिली सेंच्युरी उधारीच्या बॅटने झळकवली. कोचने तिलकला भरपूर साथ दिली. चार वर्षानंतर तिलक वर्माने विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये कमाल केली. त्यानंतर तिलकने कधी मागे वळून पाहिलं नाही.