मुंबई: मुंबई इंडियन्स आयपीएलमधली सर्वात यशस्वी टीम आहे. आता दक्षिण आफ्रिकेत टी 20 लीग सुरु होत आहे. तिथे यशाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी मुंबई इंडियन्सची टीम सज्ज आहे. पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ही टी 20 लीग सुरु होणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने कोचिंग स्टाफची घोषणा केली आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सायमन कॅटिचला मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमच हेड कोच बनवण्यात आलय. सायमन कॅटिचला आयपीएलमध्ये कोचिंगचा मोठा अनुभव आहे. तो केकेआर आणि आरसीबीचा कोच होता.
हाशिम अमलाकडेही जबाबदारी
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाला मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमच बॅटिंग कोच बनवण्यात आलय. अमलाने आपल्या करीयरमध्ये एकूण 88 शतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये हाशिम अमलाने दोन शतकं झळकावली आहेत.
फिल्डिंग कोच कोण?
न्यूझीलंडचा माजी खेळाडू जेम्स पामेंटवर फिल्डिंग कोचची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तो मुंबई इंडियन्सकडूनही खेळलाय. एक माजी दक्षिण आफिकन खेळाडू रॉबिन पीटरसन टीमचा जनरल मॅनेजर असेल.
सायमन कॅटिच काय म्हणाले?
“मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमच्या हेड कोचपदी निवड होणं, ही सन्मानाची बाब आहे. एकानव्या टीमची उभारणी करणं, नेहमीच खास असतं. यात तुमचं कौशल्य दिसतं. टीमची एक संस्कृती बनवता येते” असं सायमन कॅटिच म्हणाले.
बॅटिंग कोच बनल्याने मी उत्साहित आहे
“मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमचा बॅटिंग कोच बनल्याने मी उत्साहित आहे. मुंबई इंडियन्स टीमचे मालक, व्यवस्थापन आणि मॅनेजरचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळे हे शक्य झालं” असं हाशिम अमला म्हणाला.