MI vs CSK : मुंबई कुठे हरली माहितीय का? ‘या’ चार ओव्हरमध्ये CSK ने मुंबईकडून हिसकावला सामना

| Updated on: Apr 15, 2024 | 7:53 AM

MI vs CSK : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला काल पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईवर आरामात विजय मिळवला. धोनीवर आलेल्या चित्रपटात एक डायलॉग आहे, “पता है हम कहां हारे?”…’ हाच डायलॉग आता मुंबई इंडियन्सच्या टीमबद्दल सुद्धा म्हटला जाऊ शकतो. सामना मुंबईने तिथेच गमावला.

MI vs CSK : मुंबई कुठे हरली माहितीय का? या चार ओव्हरमध्ये CSK ने मुंबईकडून हिसकावला सामना
Ms dhoni-Rohit Sharma
Image Credit source: PTI
Follow us on

“पता है हम कहां हारे?”…’ ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील धोनीचा हा डायलॉग खूप हिट झाला होता. त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि झारखंडच्या सामन्या दरम्यान टीमचा पराभव होतो. युवा धोनी आपल्या मित्रांसोबत पराभवाचा विश्लेषण करत असतो, असा त्या चित्रपटात सीन आहे. धोनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आल्यानंतर टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन झाला. हाच डायलॉग अनेक टीम्स आणि त्यांच्या कॅप्टन्सनी म्हटला असेल. IPL 2024 मध्ये रविवारी रात्रीच्या सामन्यानंतर हीच लाइन मुंबई इंडियन्सच्या टीमबद्दल सुद्धा म्हटली जाऊ शकते. ‘पता है मुंबई कहां हारी?’

वानखेडे स्टेडियमवर 14 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 20 रन्सनी हरवलं. या मॅचमध्ये अखेरच्या षटकात एमएस धोनीने 3 सिक्ससह 4 बॉलमध्ये 20 धावा फटकावल्या. चेन्नईच्या विजयामध्ये याच धावा निर्णायक ठरल्या. चेन्नईकडून युवा वेगवान गोलंदाज मतीषा पतिरणाने उत्तम गोलंदाजी करुन 4 विकेट घेतल्या. तो चेन्नईच्या विजयात हिरो ठरला. मुंबईसाठी माजी कॅप्टन रोहित शर्माने दमदार शतक ठोकलं. पण त्याचा उपयोग झाला नाही.

गेम चेंजिंग काय ठरलं?

चेन्नईने विजयासाठी दिलेलं 207 धावांच टार्गेट मुंबईला पार करता आलं नाही. 20 ओव्हर्समध्ये त्यांनी 186 धावा केल्या. मुंबईची टीम एकवेळ चांगल्या स्थितीमध्ये दिसत होती. रोहित शर्मा आक्रमक बॅटिंग करत होता. हार्दिक पांड्या, टिम डेविड, रोमारिया शेफर्ड आणि मोहम्मद नबी यांची फलंदाजी बाकी होती. रोहित शेवटपर्यंत क्रीजवर होता. वरती उल्लेख केलेल्या सर्वांना फलंदाजीची संधी मिळाली. पण मुंबईची टीम जिंकू शकली नाही. धोनीचे 3 सिक्स आणि पतिरणाचे 4 विकेट गेम चेंजर ठरले. त्याचवेळी CSK ने मधल्या 4 ओव्हरमध्ये सामना फिरवला.

जिव्हारी लागली असेल, ती शार्दुलची ओव्हर

13 व्या ओव्हरपासून सामना चेन्नईच्या बाजूने झुकला. रोहित आणि तिलक वर्मा बॅटिंग करताना वेगाने धावफलक हलत होता. स्पिनर रवींद्र जाडेजाने 13 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या. त्याची भरपाई पुढच्या ओव्हरमध्ये होईल असं वाटत होतं. पण 14 व्या ओव्हरमध्ये आलेल्या पतिरणाने तिलकची विकेट काढली व फक्त 6 धावा दिल्या. मुंबईला सर्वात जास्त लागली असेल, ती 15 वी ओव्हर. त्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर हार्दिक आणि रोहितने फक्त 2 धावा काढल्या. दोघे 3-3 चेंडू खेळले पण 1-1 रन्सच काढला.

सामना तिथेच मुंबईच्या हातून निसटला

त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये तृषार देशपांडेने सुद्धा टिच्चून गोलंदाजी केली. हार्दिकचा विकेट काढला व फक्त 3 धावा दिल्या. म्हणजे त्या 4 ओव्हरमध्ये मुंबईला फक्त 17 धावा करता आल्या. त्यांनी 2 महत्त्वाचे विकेटही गमावले. 12 व्या ओव्हरमध्ये मुंबईने 2 विकेट गमावून 118 धावा केल्या होत्या. तेच 16 व्या ओव्हरमध्ये मुंबईची स्थिती 4 बाद 135 होती. सामना तिथेच मुंबईच्या हातून निसटला. त्यांच्यावर दबाव वाढत गेला. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये मुंबईने 51 धावा बनवल्या. पण तो पर्यंत उशीर झालेला.