मुंबई : IPL 2024 चा सीजन सुरु व्हायला आता फक्त चार दिवस उरले आहेत. सगळ्याच क्रिकेट प्रेमींना अस झालय की, कधी एकदा आयपीएल सुरु होते. मुंबई महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींची हक्काची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स या टीमचे देशभरात चाहते आहेत, खासकरुन महाराष्ट्रात ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबई इंडियन्सची टीम आपल्या फॅन्सना फार निराश करत नाही. मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधला ट्रॅक रेकॉर्डच तसा आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. अशी कामगिरी करण फक्त एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीमला जमलं आहे. मुंबई इंडियन्सची टीम फक्त क्रिकेटच्या मैदानातच सक्रीय नसते, तर मैदानाबाहेरही सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स तितकीच Active आहे. चाहत्यांना आपल्यासोबत जोडण्यासाठी मुंबई इंडियन्सची सोशल मीडिया टीम नेहमीच काहीतरी क्रिएटीव्ह करत असते.
आता सुद्धा मुंबई इंडियन्सने अशीच एक क्रिएटीविटी केलीय, ज्याची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. टीम डेविड हा मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का. मागच्या दोन सीजनमध्ये टीम डेविडने आपण काय करु शकतो हे दाखवून दिलं. त्यामुळेच टीम डेविडची कायरन पोलार्ड या मुंबई इंडियन्सच्या यशस्वी ऑलराऊंडर बरोबर तुलना होते. सामना कितीही कठीण परिस्थितीत असला, पण मैदानावर टीम डेविड असेल, तो पर्यंत विजयाची खात्री देता येते. टीम डेविड अगदी सहज फोर, सिक्सचा पाऊस पाडतो. त्यामुळे टीम डेविडची आयपीएलमध्ये एक दहशत आहे.
आदेश बांदेकरांची कमेंट काय?
हाच टीम डेविड आता मुंबई इंडियन्सच्या महिला चाहत्यांसाठी पैठणी घेऊन आलाय. ‘होम मिनिस्टर’ हा गृहिणी वर्गात लोकप्रिय असलेला कार्यक्रम. आदेश बांदेकर यांच्या सूत्र संचालनाने ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलय. त्यामुळे कुठेही असताना दार उघड बये.. दार उघड हे शब्द कानावर ऐकू आले की, समजायच बांदेकर भावोजींचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सुरु झालाय. याच कार्यक्रमाचा आधार घेऊन मुंबई इंडियन्सने टीम डेविडचा एक व्हिडिओ बनवलाय.
या व्हिडिओला ‘दार उघड बये.. दार उघड’ असं कॅप्शन दिलय. त्यामुळे हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द आदेश भावोजींना रहावलं नाही. त्यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला व लिहिल ‘धाकटे भाऊजी टिम जिंकलीच पाहिजे’