लाहोर : PSL 2023 मध्ये मुल्तान सुल्तांसची टीम भले मॅच हरली असेल, पण त्यांचा एक बॅट्समन टिम डेविडने सगळ्यांचच मन जिंकलं. पाकिस्तान सुपर लीगच्या 8 व्या सीजनमध्ये टिम डेविड पहिलाच सामना खेळत होता. त्याने इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टिम डेविडने 27 चेंडूत 60 धावा चोपल्या. यात 5 सिक्स आणि 4 फोर होते. टिम डेविडच्या बॅटिंगच्या बळावर मुल्तान सुल्तांसची टीम 205 धावांपर्यंत पोहोचली. इस्लामाबाद युनायटेडच्या टीमने एक चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठलं.
पाकिस्तानी गोलंदाजावर हल्लाबोल
टिम डेविड बद्दल बोलायच झाल्यास त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रुमान रईसची वाट लावून टाकली. रुमानच्या एका ओव्हरमध्ये टिम डेविडने सलग चार सिक्स मारले. या ओव्हरमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 30 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये रुमानच्या गोलंदाजीवर मुल्तान सुल्तांसच्या फलंदाजांनी 4 सिक्स आणि एक फोर मारला.
16 व्या ओव्हरमध्ये रुमानची धुलाई
रुमान रईसने आपल्या दोन ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर इस्लामाबादचा कॅप्टन शादाबने त्याच्याहाती चेंडू सोपवला. पण हा डाव उलटा पडला. रुमानचा पहिला चेंडू वाइड होता. त्यानंतर शान मसूदने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. स्ट्राइकवर टिम डेविड आला. त्याने कमालीचे शॉट्स मारले. रुमान रईसच्या चार चेंडूंवर सलग 4 सिक्स मारले. टिम डेविडच्या हिटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
5⃣0⃣ Partnership and 3⃣0⃣ off the over ?#HBLPSL8 | #SabSitarayHumaray l #IUvMS pic.twitter.com/kbWimMiLNT
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 7, 2023
टिम डेविडच तुफान
टिम डेविडने फक्त 20 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. पाकिस्तान सुपर लीगच्या या सीजनमधील हे वेगवान अर्धशतक आहे. टिम डेविडचा पीएसएलमधील रेकॉर्ड कमालीचा आहे. टिम डेविडने या लीगमध्ये 18 इनिंगमध्ये 43.16 च्या सरासरीने 518 धावा फटकावल्या आहेत.
टिम डेविडचा स्ट्राइक रेट 186 चा आहे. टिम डेविड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मागचा सीजन त्याने गाजवला होता. आता पीएसएलमधील त्याच्या परफॉर्मन्समुवळे मुंबई इंडियन्सची टीम निश्चित आनंदात असेल.