मुंबई: मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमचा विस्तार सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींनी अन्य देशातील लीगमध्ये टीम्स विकत घेतल्या आहेत. त्यामुळे कोचिंग स्टाफच्या जबाबदारीत काही बदल केले आहेत. माहेला जयवर्धने आणि झहीर खान या दोघांना आणखी मोठी भूमिका दिली आहे. माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे हेड कोच होते.
आता जयवर्धने यांच्याकडे परफॉर्मन्स ग्लोबल हेड म्हणून जबाबदारी असणार आहे. झहीर खान क्रिकेट डेव्हलपमेंट हेड असणार आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलसाठी नवीन हेड कोच जाहीर करणार आहे. 2017 पासून माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे हेड कोच होते.
मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजींनी दुबईत ILT20 मध्ये आणि SA20 मुंबई इंडियन्स केप टाऊनमध्ये टीम विकत घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या या दोन्ही नव्या टीम्सचा हा पहिलाच सीजन असणार आहे. यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत ही लीग होणार आहे.
इएसपीए क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदावर नवीन नियुक्ती लवकरच जाहीर केली जाईल. नव्या रोलमध्ये जयवर्धने प्रचंड व्यस्त असतील. त्यांच्याकडे वेगवेगळ्या टीम्सची जबाबदारी असणार आहे. त्यांना संपूर्ण कोचिंग स्टाफावर लक्ष ठेवावं लागेल. खेळाडूंची निवड आणि रणनितीक प्लानिंगमध्ये महत्त्वाचा रोल असेल. वेगवेगळ्या लीगमधील टीमला यश मिळवून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर असेल.
“मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल क्रिकेट ऑपरेशन्सच नेतृत्व करायला मिळणं, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मुंबई इंडियन्सचा जागतिक स्तरावर विकास होताना पाहणं, ही आनंदाची बाब आहे” असं जयवर्धने म्हणाले. वेगवेगळ्या देशांमधील क्रिकेट टॅलेंट शोधणं, खेळाडूंचा विकास ही झहीर खानवर जबाबदारी असेल.