मुंबई : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा सध्या खराब फॉर्म सुरु आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. त्यामुळे रोहित शर्मावर चौफेर टीका सुरु आहे. रोहित शर्मा चालू आयपीएल सीजनमध्ये विशेष काही करु शकलेला नाही. रोहितच्या या फॉर्मवर प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोक मत मांडल आहे. सुनील गावस्कर हे स्पष्ट मत मांडण्यासाठी ओळखले जातात.
रोहित शर्मा कालच्या मॅचमध्ये ओपनिंगला न येता तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आला. दीपक चाहरच्या गोलंजीवर एमएस धोनीने सापळा रचून त्यात रोहितला अलगद अडकवलं. रोहित शर्मा क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून ओळखला जातो. पण कृष्णमचारी श्रीकांत यांनी टीका करताना त्याला नाव बदलण्याचा सल्ला दिला. “रोहितने त्याचं नाव बदलून नो हिट शर्मा करुन घ्यावं. मी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असतो, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सुद्धा स्थान दिलं नसतं” असं श्रीकांत म्हणाले.
गावस्करांचा रोहितला सल्ला काय?
रोहितचा सध्याचा फॉर्म पाहून सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माल ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. आयसीसी WTC फायनलच्यावेळी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्यांनी रोहितला ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. इंग्लंडमध्ये द ओव्हलवर 7 जूनपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये WTC फायनल रंगणार आहे.
‘स्वत:साठी ब्रेक घ्यावा’
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्यावेळी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोहितने ब्रेक घ्यावा. शेवटच्या काही सामन्यांमध्ये तो पुन्हा खेळू शकतो. पण सध्या त्याने स्वत:साठी ब्रेक घ्यावा” असं गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले. चेन्नई सुपर किंग्सने काल मुंबई इंडियन्सवर 6 विकेट राखून विजय मिळवला.
आता ती वेळ आली का?
“रोहित शर्मा ज्या शॉटवर आऊट झाला, तो कॅप्टनचा शॉट नव्हता. टीम संकटात असताना कॅप्टन डाव सावरतो. टीमला चांगली धावसंख्या उभारुन देतो. तुम्ही फॉर्ममध्ये असाल, तर मी स्कूप शॉट समजू शकतो. पण तुम्ही दोनदा शुन्यावर आऊट झालेले असताना, हा मोठा फटका आहे. तुम्ही एकेरी-दुहेरी धावा पळून काढा. त्यानंतर मोठे शॉट मारा. त्याने थोडा ब्रेक घेतला, तर त्याच्यासाठी चांगलं होईल. यावर स्वत: रोहितने आणि मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने निर्णय घेतला पाहिजे” असं सुनील गावस्कर म्हणाले.