मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा फलंदाज सरफराज खानसाठी अखेर भारतीय क्रिकेटचे दरवाजे उघडले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याची टीम इंडियात निवड झालीय. विशाखापट्टनम टेस्टसाठी सरफराजची टीममध्ये निवड होईल, असं बोलल जात होतं. पण त्याच्याऐवजी रजत पाटीदारच प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराजने खोऱ्याने धावा केल्या आहेत. सलग दोन रणजी ट्रॉफी स्पर्धांमध्ये 900 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 25 सामन्यात त्याची सरासरी 82.83 आहे. सरफराज खान प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी तो ड्रेसिंग रुममध्ये असेल. तो अनुभव सुद्धा भविष्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतक्या धावा करुनही त्याला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? असा प्रश्न अनेकदा उपस्थित झालाय. त्याची निवड न करण्यावरुनही वाद झालेत.
सरफराज खानच्या बाबतीत त्याच्या फिटनेसचा मुद्दा निवड समितीच्या काही सदस्यांनी उपस्थित केला होता. सरफराजला कष्ट चुकलेले नाहीत. त्याला काहीही सहजतेने मिळालेलं नाही. फिटनेसचा मुद्दा असूनही त्याने अनेक शतकी खेळी साकारल्या आहेत. आता त्याची कामगिरी ध्यानात अखेर सरफराजला संधी मिळाली आहे.
सरफराज काय म्हणाला?
“मला विराट कोहली, एबी डी विलियर्स, सर विवियन रिचर्ड्स आणि जावेद मियाँदाद यांची बॅटिंग बघायला आवडते. मी जावेद मियाँदाद सारखा खेळतो अस मला माझे वडिल म्हणतात. मी जो रुटची बॅटिंग सुद्धा आवडीने बघतो. जो कोणी यशस्वी ठरतोय, त्याचा खेळ मी पाहतो. ते पाहून माझ्या खेळात मी तशी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. रणजी ट्रॉफी असो किंवा भविष्यात भारताकडून खेळण मी हे सुरुच ठेवणार” असं सरफराज जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला.
‘पण माझ्या वडिलांचा मेहनतीवर विश्वास होता’
“माझ्या वडिलांनी माझी क्रिकेटशी ओळख करुन दिली. मी अजून क्रिकेट कसा खेळतोय हा मला प्रश्न पडतो. मी आक्रमक फलंदाज आहे. मी इतरांपेक्षा लवकर आऊट व्हायचो. मोठी धावसंख्या उभारण कठीण होतं. मी बाद झाल्यानंतर दुसऱ्यांना मोठी खेळी करताना पाहून मी निराश व्हायचो. पण माझ्या वडिलांचा मेहनतीवर विश्वास होता. आज माझ्याकडे जे काही आहे, ते त्या मेहनतीमुळे” अस सरफराजने सांगितलं.