IND vs SL : युजवेंद्र चहल ते कुलदीप यादव, फिरकीच्या जोडीला दीपक-नवदीपचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?

| Updated on: Jun 11, 2021 | 7:44 AM

भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय तर दुसरा एक संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जातोय. जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. | India Tour of Sri Lanka

IND vs SL : युजवेंद्र चहल ते कुलदीप यादव, फिरकीच्या जोडीला दीपक-नवदीपचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?
Indian Bowler
Follow us on

मुंबई :  भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय तर दुसरा एक संघ आता श्रीलंका दौऱ्यावर (India Tour of Sri Lanka) जातोय. जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात विराट-रोहित-बुमराह-शमी असे दिग्गज खेळाडू नसतील. या दिग्गजांशिवाय भारताला श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. बऱ्याच काळानंतर संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीला संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाजीमध्ये आयपीएल जागवणाऱ्या चार बोलर्सचा समावेश करण्यात आला आहे. (Navdeep Saini Deepak Chahar Chetan Sakariya varun chakravarthy kuldeep yadav And Yuzvendra Chahal will be charge of bowling for Team India Tour of Srilanka)

भारताची वेगवान तोफ कशी असेल?

बीसीसीआयने या अंतिम सामन्यासाठी एकूण 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. भारतीय खेळाडूंचा आपआपसात अधिक सराव व्हावा आणि अनेक पर्याय उपलब्ध असावेत या उद्देशाने बीसीसीआयने तगडा संघ जाहीर केला. 20 पैकी 6 खेळाडू हे निव्वळ गोलंदाज आहेत तर आणखी 3 खेळाडू बॅट आणि बॉलने आपली करामत दाखवण्यास सज्ज आहेत. गोलंदाजांमध्ये आयपीएल गाजवणाऱ्या दीपक चाहर (Dipak Chahar), नवदीप सैनी (Navdeep Saini), चेतन साकरिया (Chetan Sakariya), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

कुलदीपच्या जोडीला चहल-चहरची साथ!

भारताच्या वेगवान तोफेच्या जोडीला फिरकीपटू कुलदीप यादव (kuldeep yadav), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), राहुल चहर (Rahul Chahar) या तोडीसतोड खेळाडूंचा समावेश आहे. खूप दिवसांनंतर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन खेळाडूंची एका दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे. दोघांनीही अनेक वेळा निवडीबाबत आपली खंत बोलून दाखवली होती. कॅप्टन कूलने त्याच्या कारकीर्दीत या दोन फिरकीपटूंचा अतिशय खुबीने वापर करुन घेतला. अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा कुलदीप-युजवेंद्रकडून विकेट्स मिळवून घेतल्या. परंतु धोनीच्या निवृत्तीनंतर युझी-कुलदीपला संघात एकत्रितरित्या स्थान मिळत नव्हतं.

अष्टपैलू खेळाडू कोण कोण?

क्रिष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या या खेळाडूंचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. पांड्या बंधूंना आयपीएलच्या 14 व्या मोसमात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना 14 व्या मोसमात पांड्या ब्रदर्सकडून त्यांना साजेशी कामगिरी झाली नाही. आता श्रीलंका दौऱ्यावर निवड होणं त्यांच्यासाठी फार मोठी संधी असेल. हार्दिकने याअगोदर भारताला अनेक आंतरराष्ट्रीय मॅचेस जिंकून दिल्या आहेत. बॅट आणि बॉलने त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे. परंतु मागील जवळपास एक वर्षापासून खांद्याच्या दुखापतीमुळे तो बोलिंग टाकू शकत नाही. आशा आहे की श्रीलंका दौऱ्यावर तो प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज असेल.

दुसरीकडे कृणालच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. त्याला छोट्या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं जमत नाहीय. आयपीएलमध्ये हे दिसून आलं. आता श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी त्याला फटकेबाजी करुन जास्तीत जास्त धावा करणं त्याच्यासमोरील आव्हान असणार आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

(Navdeep Saini Deepak Chahar Chetan Sakariya varun chakravarthy kuldeep yadav And Yuzvendra Chahal will be charge of bowling for Team India Tour of Srilanka)

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!