चेन्नई : मागच्या 25 दिवसांपासून IPL 2023 मध्ये नवीन उल हकला टार्गेट केलं जातय. तो सीमारेषेवर उभा दिसला की, प्रेक्षकांकडून कोहली, कोहलीच्या घोषणा दिल्या जातात. क्रिकेटप्रेमी त्याला मुद्दामून डिवचण्यासाठी असं करतात. या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यावेळी लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर आणि नवीन उल हक विराट कोहलीला भिडले होते.
नवीन बद्दलचा तोच राग प्रेक्षकांच्या मनात आहे. तो मैदानावर दिसला की, क्रिकेटप्रेमींकडून मुद्दामून त्याला डिवचण्यासाठी कोहली, कोहलीच्या घोषणा दिल्या जातात. विराट भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. नवीन-उल-हकने थेट त्याच्याशी पंगा घेतला.
रोहितला बाद केल्याच हटके सेलिब्रेशन
मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्याच्यावेळी नवीन गोलंदाजीसाठी येताच प्रेक्षकांमधून कोहली, कोहलीच्या घोषणा सुरु झाल्या. मुंबईचा ओपनर रोहित शर्माल बाद करुन त्याने या घोषणा शांत केल्या. नवीन उल हक अफगाणिस्तानातचा क्रिकेटपटू आहे. रोहितला बाद केल्यानंतर नवीनने कानात बोटं घालून नो नॉइज सेलिब्रेशन केलं.
नवीन उल हक काय म्हणाला?
जेव्हा नवीनला या बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने आपण या वातावरणाचा आनंद घेतो, असं त्याने सांगितलं. “कोहली, कोहलीच्या घोषणा ऐकल्या की, आपल्या टीमसाठी अजून चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रेरित होतो, मला आवेश चढतो. प्रोफेशनल खेळाडूला अशी परिस्थिती हाताळता आली पाहिजे. बाहेरच्या आवाजामुळे आपल्या खेळावर परिणाम होणार नाही, हे पाहिलं पाहिजे” असं नवीन उल हक म्हणाला.
‘त्यावेळी हेच लोकं तुमच नाव घेतील’
“मी बाहेरच्या आवाजावर लक्ष देत नाही. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो. गर्दीमधून घोषणाबाजी होतेय, कोणी काहीतरी बोलतय त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. एखादा दिवस तुम्हाला तुमच्या टीमसाठी सर्वोत्तम कामगिरी करता येणार नाही. पण दुसऱ्यादिवशी तुम्ही तुमच्या टीमसाठी खास कामगिरी करु शकता. त्यावेळी हेच लोकं तुमच नाव घेतील” असं नवीन म्हणाला.
नवीन उल हक आयपीएलच्या चालू सीजनमध्ये वादांमुळे चर्चेत राहिला. पण त्याने एकूण 11 विकेट घेतले. मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटरच्या सामन्यात त्याने सर्वाधिक चार विकेट काढले. एलिमिनेटरच्या सामन्यात रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चार महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं.