वेलिंग्टन: टीम इंडियाकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये अस्वस्थतता आहे. कालच टी 20 सीरीजचा तिसरा सामना डकवर्थ लुइस नियमानुसार टाय झाला. त्यामुळे भारताने ही सीरीज 1-0 ने जिंकली. या पराभवानंतर टीमचा अनुभवी ओपनर मार्टिन गप्टिलने एक निर्णय घेतलाय. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गप्टिल सोबतचा सेंट्रल करार तोडला आहे.
ट्रेंट बोल्टच्या पावलावर पाऊल
मागच्या 14 वर्षांपासून गप्टिलचा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाबरोबर सेंट्रल करार होता. गप्टिलच्या मागणीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने करार संपवायला सहमती दर्शवली. न्यूझीलंड बोर्डाच्या सेंट्रल करारामधून गप्टिल रिलीज झालाय. त्याने सहकारी ट्रेंट बोल्टच्या पावलावर पाऊल ठेवलय.
संधी मिळत नव्हती?
मार्टिन गप्टिल मागच्या 14 वर्षांपासून न्यूझीलंडच्या मर्यादीच्या षटकांच्या टीमचा नियमित सदस्य होता. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीमचा सदस्य होता. पण तिथे त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर भारताविरुद्ध टी 20 आणि वनडे सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड झाली नाही.
NZC ने मार्टिन सोबतचा करार संपवला
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मार्टिन गप्टिलने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली. त्यानंतर तात्काळ प्रभावाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय झाला. सेंट्रल करार संपवण्याचा अर्थ असा आहे की, तो सुद्धा आता बोल्ट प्रमाणे जगातील कुठल्याही लीगमधून क्रिकेट खेळू शकतो. त्याशिवाय आपल्या देशाच्या टीमकडूनही खेळू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती नाही
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गप्टिलने न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममधून बाहेर पडला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याच गप्टिलने स्पष्ट केलय. न्यूझीलंड टीमला गरज असेल, तेव्हा तो उपलब्ध असेल.