मुंबई: डबलिन येथे आयर्लंड आणि न्यूझीलंड (IRE vs NZ) मध्ये तिसरा वनडे सामना झाला. या मॅच मध्ये आयर्लंडने न्यूझीलंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. आयर्लंडचे दोन फलंदाज पॉल स्टर्लिंग (paul stirling) आणि हॅरी टेक्टरने (harry tector) जबरदस्त प्रदर्शन केलं. न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाने अवघ्या 1 रन्सने रोमांचक विजय मिळवला. आयर्लंडचा मागच्या चार पैकी तीन सामन्यात अटीतटीच्या लढतीत पराभव झाला होता. भारताविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात अवघ्या 4 रन्सनी त्यांचा पराभव झाला होता. पहिल्या वनडेत न्यूझीलंडकडून एक विकेटने आणि आता तिसऱ्या वनडे 1 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात असं सहाव्यांदा झालय, जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम मधील दोघांनी शतक झळकावल पण टीम पराभूत झाली. 2019 मध्ये ज्यो रुट आणि जोस बटलरने धावांचा पाठलाग करताना शतक ठोकलं होतं. आबिद आणि रिजवानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, शिखर धवन आणि विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच शतक झळकावलं होतं. कार्लिस्ले आणि इरविनने भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं. अजहर आणि जाडेजाने श्रीलंकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावलं होतं. पण त्यानंतरही संघाचा पराभव झाला होता. कुठल्याही संघाचा अवघ्या 1 रन्सने विजय होण्याची ही 33 वी वेळ आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 115 धावा आणि हेनरी निकोल्सने 79 धावा फटकावल्या. त्या बळावर न्यूझीलंडने 6 विकेट गमावून 360 धावा केल्या. त्याशिवाय ग्लेन फिलिप्सने 47 धावांची खेळी केली.
361 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या आयर्लंडची खूपच खराब सुरुवात झाली होती. अवघ्या 7 धावांवर कॅप्टन एंडी बलबर्नीच्या रुपात आयर्लंडची पहिली विकेट गेली. एंडी मॅकब्रेन 62 धावांवर आऊट झाला. दोन विकेट गेल्यानंतर पॉल स्टर्लिंगला हॅरी टेक्टरची साथ मिळाली. दोघांनी आयर्लंडची धावसंख्या 241 पर्यंत पोहोचवली. स्टर्लिंग 120 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आयर्लंडची धावगती थोडी मंदावली. टेक्टरने छोट्या-छोट्या भागीदाऱ्याकरुन विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. संघाची धावसंख्या 310 असताना, हॅरी टेक्टरला आऊट झाला. जॉर्ज डॉकरेलने 22 धावा करुन न्यूझीलंडच टेन्शन वाढवलं. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या चेंडूवर हुमेने सिंगल धाव घेतली. पुढच्या चेंडूवर यंगने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर यंग एक रन्स पूर्ण करुन रनआऊट झाला. 5 व्या चेंडूवर लिटिलने सिंगल घेतला. शेवटच्या चेंडूवर आयर्लंडला विजयासाठी 3 आणि टायसाठी 2 धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर एकच धाव निघाली.