मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाला झटका बसला आहे. आधी पाकिस्तान त्यानंतर श्रीलंकेकडून टीम इंडियाचा पराभव झाला. खरंतर टीम इंडियाला विजेतेपदाच दावेदार समजल जात होतं. पण टीम इंडियाच आव्हान आता जवळपास संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्याटीमच्या निकालावर अवलंबून रहाव लागणार आहे.
टीम इंडिया हरली त्याची अनेक कारणं आहेत. त्यातल एक मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच निराशाजनक प्रदर्शन. ग्रुप स्टेजमध्ये तीन वेगवान गोलंदाज टीममध्ये होते. त्यानंतर रोहितने दोन स्पेशलिस्ट बॉलर आणि ऑलराऊंडरला प्राधान्य दिलं.
भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह या तिघांनी धावा दिल्या. ते धावगतीला लगाम घालू शकले नाहीत. हे पराभवाच एक कारण आहे. दोन्ही सामन्यात पावरप्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्समध्ये टीम इंडियाचे गोलंदाज विकेट काढू शकले नाहीत.
टीम इंडियाला दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवली. इरफान पठानने मोहम्मद शमीच नाव सुचवलं आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करुन विकेट काढण्यात शमी तरबेज असल्याचं इरफान म्हणाला. “तुम्ही जो संघ निवडला, त्यात सहावा बॉलर निवडला नाही. पाच गोलंदाजांकडून तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. आता इथे वर्ल्ड कप टीममध्ये शमीचा समावेश करण्याची संधी आहे. तुम्ही नव्या चेंडूचा विचार करत असाल, तर मोहम्मद शमी इतका दुसरा चांगला पर्याय नाही” असं इरफान स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला.
“आज अनेक गोलंदाज तुमच्यासमोर आहेत. अनेक पर्याय आहेत. पण ते तरुण आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. अनुभव आणि फॉर्मचा विचार केला, तर मोहम्मद शमी या शर्यतीत पुढे आहे” असं इरफानने सांगितलं.