AUS vs NZ | ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. वेलिंगटनमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ख्राइस्टचर्च येथील दुसरा कसोटी सामना 3 विकेटने जिंकला. ऑस्ट्रेलियाने अशा प्रकारे न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर दबदबा कायम आहे. याआधी T20 सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडला धूळ चारली होती.
ख्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 279 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. कसोटीच्या चौथ्या डावात विजयी लक्ष्य गाठण सोपं नव्हतं. एकवेळ ऑस्ट्रेलियाचे 80 रन्सवर 5 विकेट गेले होते. त्यावेळी न्यूझीलंडची बाजू वरचढ होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरीने क्रीजवर एकबाजू लावून धरली. 25 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी विकेटकीपर फलंदाज म्हणून एडम गिलख्रिस्टने जे केलं होतं, तेच या कसोटीच कॅरीने केलं.
25 वर्षानंतर तेच काम कॅरीने ऑस्ट्रेलियासाठी केलं
वर्ष 1999 मध्ये गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियासाठी पहिला असा विकेटकीपर ठरला होता, ज्याने चौथ्या इनिंगमध्ये 90 पेक्षा जास्त धावा करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिलेला. गिलख्रिस्टने होबार्टच्या त्या कसोटीत चौथ्या डावात नाबाद 149 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियासाठी तेच काम वर्ष 2024 मध्ये एलेक्स कॅरीने केलय. त्याने नाबाद 98 धावांची खेळी करुन ख्राइस्टचर्चमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
कॅरीने फक्त धावाच केल्या नाही, तर….
ख्राइस्टचर्चमध्ये नाबाद 98 धावांची खेळी करुन इतिहासाची पुनरावृत्ती करणाऱ्या एलेक्स कॅरीने कॅच पकडण्यातही मोठी कामगिरी केली. त्याने दोन्ही डावात मिळून एकूण 10 कॅच घेतल्या. त्याने या कसोटीत एकूण 114 धावा आणि 10 कॅच पकडण्याची कामगिरी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मालिकावीराचा पुरस्कार सीरीजमध्ये 17 विकेट घेणारा न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेनरीला मिळाला.
WTC पॉइंट्स टेबलध्ये न्यूजीलंडच नुकसान
वर्ष 2000 पासून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंडमध्ये एकूण 27 टेस्ट मॅच झाल्या आहेत. यात 21 कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. न्यूझीलंडला फक्त एक कसोटीत विजय मिळाला. दोन्ही टीममधील पाच टेस्ट मॅच ड्रॉ झाले.
ख्राइस्टचर्च टेस्टमधील पराभवाच न्यूजीलंडला WTC पॉइंट्स टेबलमध्येही नुकसान झालं. एका क्रमांकाने घसरण होऊन, दुसऱ्यावरुन ते तिसऱ्या स्थानावर आले. न्यूजीलंडला हरवून ऑस्ट्रेलियाने दुसर स्थान मिळवलय. भारत WTC टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.