वेलिंग्टन: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही टीमच आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आलं. न्यूझीलंडचा पाकिस्तान तर टीम इंडियाचा इंग्लंडने पराभव केला. आजपासून टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीज सुरु होणार होती. वर्ल्ड कपमधील पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आज एक नवीन सुरुवात करणार होती. हार्दिक पंड्याकडे या टीमच नेतृत्व आहे. अनेक युवा खेळाडूंना या सीरीजमध्ये संधी दिली आहे.
आता दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा
त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्याकडे टीम इंडियाच्या चाहत्यांचे डोळे लागले होते. वेलिंग्टनमध्ये हा सामना होणार होता. पण पावसाने या सामन्यावर पाणी फिरवलं. आता रविवारी माऊंट माउंगानुई येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हार्दिक पंड्यासाठी हा दौरा म्हणजे एक अग्निपरीक्षा
टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडू या सीरीजमध्ये खेळत आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा, सिनियर खेळाडू विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती दिली आहे. भविष्याचा विचार करता रोहित शर्मा आणि विराट कोहली कदाचित 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे युवा खेळाडू कसे खेळतात, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हार्दिक पंड्यासाठी हा दौरा म्हणजे एक अग्निपरीक्षा आहे.
20 नोव्हेंबरला माऊंट माउंगानुई येथे कसं असेल हवामान?
वेलिंग्टनमध्ये आज होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. 20 नोव्हेंबरला माऊंट माउंगानुई येथे होणारा सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो. माऊंट माउंगानुई येथे दिवसा 90 टक्के तर रात्री 75 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे रविवारी होणाऱ्या मॅचवरही पावसाचे सावट असेल. हवामान विभागाचा अंदाज योग्य ठरला, तर कदाचित त्या दिवशीही सामना होणार नाही आणि झालाच तर त्यात वारंवार पावसाचा अडथळा येऊ शकतो.