नवी दिल्ली : संपूर्ण क्रिकेट विश्वाच लक्ष असलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. वर्ल्ड कप आजपासून सुरु होत असला, तरी टीम इंडियाच्या पहिल्या सामन्याला अजून तीन दिवस बाकी आहेत. टीम इंडिया 8 ऑक्टोंबरपासून वर्ल्ड कपमधील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. चेन्नईमध्ये ही मॅच होणार आहे. वर्ल्ड कपआधी वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-1 ने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला अलीकडे सलग 2 वनडे सीरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आधी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 3-2 ने नमवलं. त्यानंतर भारत दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण वॉर्म अप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ दाखवला. त्यावरुन ही टीम केव्हाही बाजी पलटू शकते हे स्पष्ट आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं असलं, तरी चेन्नईमध्ये आकडे वेगळीच गोष्ट सांगतात.
चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा वरचढ आहे. चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने एकूण 6 वनडे सामने खेळले आहेत. यात फक्त एका मॅचमध्ये पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने या मैदानात 4 टीम्सना पराभवाच पाणी पाजलय. यात टीम इंडिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेची टीम आहे. चेपॉक स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 3 वेळा आमने-सामने आले आहेत. यात 3 पैकी फक्त एका सामन्यात टीम इंडियाला विजय मिळालाय. 2017 मध्ये टीम इंडियाला एकमेव विजय मिळाला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम 1987 साली या मैदानात टीम इंडियावर 1 रन्सने विजय मिळवला होता. दोन्ही टीम्समध्ये याच मैदानात मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला गेला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. दोन्ही टीम्समध्ये या मैदानात 3 सामने झालेत. यात 2 वेळा ऑस्ट्रेलियाने बाजी मारलीय.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपचे आकडे पाहिले तर, इथे सुद्धा ऑस्ट्रेलिया सरस आहे. दोन्ही टीम्स वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 12 वेळा आमने-सामने आल्या आहेत. यात टीम इंडिया फक्त 4 वेळा विजयी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने 8 सामने जिंकलेत. आता 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आकड्याचा हा खेळ बदलणार का? यावर लक्ष असेल.