गुवाहाटी : पुढच्या आठवड्यापासून भारतात वनडे वर्ल्ड कप सुरु होत आहे. कालपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. आज 30 सप्टेंबर टीम इंडिया आपला पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियासमोर विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडच आव्हान आहे. वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियासमोर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्याचा सामना कसा करायचा? त्या प्रश्नाच उत्तर आजच्या सामन्यामुळे मिळू शकतं. वर्ल्ड कपआधी सराव सामन्यांसाठी तीन वेन्यू आहेत, गुवाहाटी त्यापैकी एक आहे. टीम इंडिया गुवाहाटीमध्ये पहिला सराव सामना खेळायला आज उतरणार आहे. टीम इंडियाचा पुढचा सराव सामना नेदरलँड्स विरुद्ध आहे. आज इंग्लंड विरुद्धचा सामना सराव सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. इंग्लिश टीममध्ये काही खास गुण आहेत, ज्यामुळे टीम इंडियाला अन्य मॅचसाठी तयार होण्यासाठी मदत होईल.
इंग्लंड या मॅचमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार नाही, हे स्पष्ट आहे. टीम इंडियाची सुद्धा हीच रणनिती असेल. पण, तरीही टीम इंडियासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मागच्या काही वर्षांपासून एक खास अडचणीचा सामना करतेय. स्वत: कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली सुद्धा या प्रॉब्लेमला सामोरे जातायत. ट्रेंट बोल्ट असो शाहीन शाह आफ्रिदी, मिचेल स्टार्क या दिग्गज लेफ्ट आर्म पेसर्सनी भारताच्या फलंदाजांना चांगलच हैराण केलय. फक्त हेच नाही, अन्य लेफ्ट आर्म पेसर्ससमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळलीय. लेफ्ट आर्म पेसर्सचा स्विंग आणि अँगलमुळे भारतीय फलंदाज अडचणीत येतात.
अन्य टीम्सकडे असणारी गोष्ट टीम इंडियाकडे नाही
इंग्लंडच्या टीममध्ये तीन लेफ्ट आर्म पेसर आहेत. त्यांच्या गोलंदाजीत वेग फार नाहीय. पण ते समोरच्या फलंदाजाला अडचणीत आणणारी गोलंदाजी करतात. डेविड विली आणि रीस टॉपली यांच्याकडे चांगली हाईट आहे. यामुळे त्यांच्या चेंडूंना चांगली उसळी मिळते. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये सीरीज झाली. त्यावेळी दोघांनी टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या होत्या. सॅम करन फार चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. तो सुद्धा स्विंग आणि कटर्सचा वापर करतो. टीम इंडियासोडून वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या सर्व टीम्सकडे लेफ्ट आर्म पेस गोलंदाज आहेत. त्यामुळे आज इंग्लंडच्या निमित्ताने टीम इंडियाकडे लेफ्ट आर्म पेसर्सचा सराव करण्याची चांगली संधी आहे.
आदिल रशीदच्या रुपात इंग्लंडकडे एक कमालीचा लेगस्पिनर आहे. लेग स्पिन गोलंदाजी सुद्धा टीम इंडियाची अडचण आहे. मोईन अली ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. इंग्लंडच्या टीमकडे वेगवेगळ्या प्रकारचे हाय क्वालिटी गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे यापेक्षा सराव करण्याची दुसरी चांगली संधी असू शकत नाही.
दोन्ही टीम्सचे स्क्वाड
भारत | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड | जॉस बटलर (कॅप्टन-विकेटकीपर), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस वोक्स, डेविड विली, गस एटकिंसन, मार्क वुड, आदिल रशीद आणि रीस टॉपली