मुंबई: रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोना झाल्यामुळे एजबॅस्टन कसोटीसाठी टीम इंडियाला आपला कॅप्टन बदलावा लागला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jasprit bumrah) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. बुमराहच्या कॅप्टनशिपवर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मोठ विधान केलं आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी चेतेश्वर पुजाराला इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी कॅप्टन बनवायला पाहिजे होतं, असं वसीम जाफर (Wasim jaffer) यांचं मत आहे. पुजाराकडे बुमराह पेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे त्याची कॅप्टनशिप पदावर निवड योग्य ठरली असती, असं वसीम जाफर यांचं मत आहे. “पुजाराकडे अनभुव आहे. तो 90 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळला आहे. त्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय योग्य ठरला असता. बुमराहकडे कॅप्टनशिपचा कुठलाही अनुभव नाहीय. पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवलय. तो एक चांगला कॅप्टन आहे” असं वसीम जाफर ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना म्हणाले.
चेतेश्वर पुजाराला का कॅप्टन बनवलं नाही? ते कारणही वसीम जाफर यांनी सांगितलं. “चेतेश्वर पुजाराची कसोटी संघात जागा पक्की नाहीय. त्यामुळे कदाचित त्याची संघाच्या कर्णधारपदी निवड केली नसेल. त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. कदाचित हीच गोष्ट त्याच्या विरोधात गेली असावी. दक्षिण आफ्रिका सीरीजच्यावेळी सुद्धा मी म्हटलं होतं, केएल राहुलच्या जागी तुम्ही अजिंक्य रहाणेला कॅप्टन बनवा. कारण त्याने तुम्हाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका विजय मिळवून दिला आहे” असं जाफर म्हणाला.
“जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याचं कॅप्टन बनणं निश्चित होतं. पण या सामन्याचं महत्त्व लक्षात घेता, मी पुजारालाच कॅप्टन म्हणून निवडलं असतं. जसप्रीत बुमराहला खेळाची चांगली समज आहे. कदाचित तो सुद्धा हार्दिक पंड्यासारख सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो” असंही जाफर शेवटी म्हणाले.