कराची : आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सर्व संघ सज्ज झाले आहे. काही दिवसांतच या स्पर्धेचा थरार युएईत सुरु होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) नुकतेच तीन बदल करत संघ अजून मजबूत केला. पण या बदलानंतर लगेचच संघातील एक धडाकेबाज खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे.
पाकिस्तान संघातील स्फोटक फलंदाज शोएब मकसूद (Shoaib Maqsood) विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असताना दुखापतग्रस्त झाला आहे. काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे मकसूद त्रस्त असताना आता ही दुखापत वाढल्याने तो स्पर्धेबाहेर झाला आहे. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात खेळवल्या गेलेल्या टी20 टूर्नामेंटमध्ये नॅशनल टी20 कपमध्ये 6 ऑक्टोबर रोजीच्या एका सामन्यादरम्यान मकसूदला दुखापत झाली आहे. त्यानंतर मेडीकल टीमने तपासणीनंतर त्याला विश्रांतीच्या सूचना दिल्याने तो विश्वचषकातून बाहेर झाला आहे. नुकतेच पाकिस्तान संघाने तीन बदल केले होते. त्यामुळे आता मकसूदच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
विश्वचषकासाठी सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद (दुखापग्रस्त), शाहीन आफ्रीदी
राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी
टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणदे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
हे ही वाचा
T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात
(Pakistan batsman sohaib maqsood out of T20 world cup due to back injury)