मुंबई: T20 क्रिकेटमध्ये फलंदाज अनेकदा क्षुल्लक चूका करुन आपली विकेट गमावतात. काही फुलटॉस चेंडूंवर आऊट होतात. काही हिटविकेट होतात. पाकिस्तानचा युवा विकेटकीपर फलंदाज रोहेल नजीरने यापेक्षा मोठी चूक करुन आपली विकेट गमावली. ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. रोहेल नजीर फ्री हिटवर आऊट झाला.
22 यार्डच्या खेळपट्टीवर रोहेल नजीरने मूर्खपणा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नजीरने चूक केली, पण त्याची टीम नॉर्दर्न पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा विरुद्ध 6 धावांनी सामना जिंकला.
असा झाला रन आऊट
नॉर्दर्नची टीम प्रथम फलंदाजी करत होती. सहाव्या ओव्हरमध्ये रोहेल नजीरला फ्री हिट मिळाला. गोलंदाज इहसानुल्लाहने फ्री हिटवर चांगल्या लाइन अँड लेंग्थने चेंडू टाकला. त्यामुळे रोहेलला फायदा उचलता आला नाही. त्याने मारलेला फटका हवेत उंच गेला. कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या खालिद उस्मानने कॅच घेतली.
उस्मानने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला
फ्रि हिट असल्याने रोहेल कॅचआऊट झाला नाही. पण उस्मानने नॉन स्ट्राइकच्या एन्डच्या दिशेने थ्रो फेकला. रोहेल रनआऊट झाला. रोहेलने आपल्या मूर्खपणाने विकेट गमावला. शॉट मारल्यानंतर रोहेल क्रीजवर आरामात फिरत होता. उस्मानने संधी मिळताच डायरेक्ट थ्रो केला. परिणामी रोहेलची विकेट गेली.
कोणी जिंकला सामना?
रोहेल नजीरच नॅशनल टी 20 कपमध्ये खराब प्रदर्शन कायम आहे. त्याने चार डावात 11.75 च्या सरासरीने फक्त 47 धावा केल्या आहेत. रोहेलने अजूनपर्यंत एकही षटकार मारलेला नाही. नॉर्दर्नच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 152 धावा बनवल्या. प्रत्युतरात खैबर पख्तूनख्वाच्या टीमला 146 धावाच करता आल्या. नॉर्दर्नच्या टीमने 6 रन्सनी हा सामना जिंकला.