मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटपटू आसिफ आफ्रिदीच्या (Asif Afridi) मुलीची तब्येत खूपच खराब आहे. ती रुग्णालयात दाखल असून जगण्यासाठी तिचा संघर्ष सुरु आहे. आसिफ आफ्रिदीने आपल्या मुलीचा फोटो शेयर करुन तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. आसिफ आफ्रिदी पाकिस्तानच्या (Pakistan Cricket) देशांतर्गत क्रिकेटमधील एक स्टार प्लेयर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अजून पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलेलं नाही. 35 वर्षाच्या आफ्रिदीने 2009 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. आफ्रिदी ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे. पाकिस्तान सुपर लीग 2022 मध्ये तो मुल्तान सुल्तान टीममधून खेळला. PSL 2022 लीगमध्ये त्याने एकूण 8 विकेट काढल्या. आसिफला या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी पाकिस्तानी संघात स्थान मिळालं होतं. मोहम्मद नवाजच्या जागी त्याला ही संधी मिळाली होती. आसिफ आफ्रिदीला नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु करता आला नाही.
प्रोफेशनल स्तरावर क्रिकेट खेळताना आसिफ आफ्रिदीला अजून नशिबाची साथ मिळालेली नाही. पण व्यक्तीगत जीवतनातही तो दु:खाचा सामना करतोय. त्याची मुलगी रुग्णालयात आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. आपल्या मुलीच्या सलामतीसाठी त्याने चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. त्याच्या आवाहनाला अन्य पाकिस्तानी क्रिकेटपटुंकडूनही साथ मिळतेय. सलमान बट्ट, उमर गुलसह पाकिस्तानी क्रिकेटपटुंनी आसिफ आफ्रिदीच्या मुलीसाठी प्रार्थना केली आहे.
लिस्ट-ए स्पर्धेत खैबरसाठी आसिफ आफ्रिदी शेवटचा सामना खेळला होता. त्यात तो यशस्वी सुद्धा ठरला होता. सध्या वेस्ट इंडिजचा संघ 3 वनडे सामन्यांसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. 8 जूनपासून हा दौरा सुरु होईल. देशातंर्गत क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 35 फर्स्ट क्लास सामन्यात 118 विकेट घेतल्यात. त्याशिवाय 42 लिस्ट ए सामन्यात 59 विकेट काढलेत. फर्स्ट क्लासमध्ये त्याने 1000 पेक्षा जास्त धावा केल्यात.