कोलकाता : आज शनिवार 11 नोव्हेंबर. पाकिस्तान वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये लीग स्टेजमधला आपला शेवटचा सामना खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध ही मॅच होईल. कदाचित आजच पाकिस्तानचा वर्ल्ड कप 2023 मध्ये प्रवास संपू शकतो. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध सहज विजय मिळवला, त्यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत. कोलकातामध्ये शनिवारी दुपारी 1.30 वाजता हे दरवाजे पूर्णपणे बंद होऊ शकतात. 24 तासात पाकिस्तानी टीम दुबईमार्गे आपल्या मायदेशात रवाना होईल.
ईडन गार्डन्सवर शनिवारी पाकिस्तानी टीम मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्याकडे एक छोटीशी संधी असेल. ही संधी तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा पाकिस्तान आपलं सर्वोत्तम आणि इंग्लंड सर्वात खराब क्रिकेट खेळेल. पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने मॅचच्या आदल्यादिवशीच म्हटलय की, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तानी टीम शेवटची आशा ठेऊन मैदानात उतरेल. न्यूझीलंडला मागे टाकून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडला 280 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने हरवाव लागेल.
…तर मॅचआधीच बाहेर
पाकिस्तानी टीम सर्वोत्तम क्रिकेट खेळली आणि त्यांचा दिवस असेल, तर हे शक्य आहे. पण दुपारी सामना सुरु होण्याआधी सुद्धा पाकिस्तानी टीमला आपला बोजा-बिस्तारा गुंडाळावा लागू शकतो. दुपारी 1.30 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल होईल. बाबर आजम आणि इंग्लिशन कॅप्टन नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील, त्यावेळी कौल आपल्या बाजूने लागावा, अशीच पाकिस्तानी कॅप्टन आणि त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल. असं झालं नाही तर पाकिस्तानचा खेळ संपून जाईल.
पाकिस्तानसाठी टॉस का महत्त्वाचा?
पाकिस्तानला पहिली फलंदाजी मिळणं आवश्यक आहे. कारण इंग्लंडची पहिली बॅटिंग आली, तर पाकिस्तानचा प्रवास संपून जाईल. धावांचा पाठलाग करुन सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला काहीच संधी नसेल. दुसरी बॅटिंग करताना पाकिस्तानला कुठलही लक्ष्य 3-4 ओव्हरमध्येच प्राप्त कराव लागेल. या परिस्थितीत पाकिस्तानला फारच कमी संधी असेल.