ICC Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये होणारी बैठक किंवा स्पर्धांमध्ये भारत सहभागी होत नाही. पाकिस्तानात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेचे निमंत्रण पाकिस्तानकडून भारताला मिळाले आहे. परंतु भारत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. तसेच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 पाकिस्तानामध्ये होणार आहे. त्या स्पर्धेत भारत सहभागी होणार का? किंवा भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी ठेवले जाणार? या प्रश्नांच्या उत्तरांकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवनियुक्त चेअरमन जय शाह यासंदर्भात काय निर्णय घेणार? त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा दिग्गज माजी खेळाडू बासित अली यांनी वक्तव्य केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास विनंती केली.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हटले आहे की, चॅम्पियन ट्रॉफीचा पूर्ण निर्णय आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. जर त्यांनी भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी दिली तर प्रश्नच नाही. परंतु परवानगी नाकारली तर संपूर्ण प्रकरण आयसीसीकडे जाणार आहे. त्यावेळी आयसीसीचे चेअरमन जय शाह यांना निर्णय घेणे अवघड होईल.
टीम इंडिया चॅम्पियस ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. काही रिपोर्टनुसार भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून हायब्रिड मॉडेलवर चर्चा होत आहे. भारताचे सामने पाकिस्तान ऐवजी तिसऱ्या ठिकाणी ठेवण्याची मागणी होत आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ही मागणी फेटाळली आहे. स्पर्धा पाकिस्तानातच होणार असल्याचे म्हटले आहे.
बासित अली यांनी पीसीबीला सल्ला दिला आहे. पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या संघाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी पीसीबीची आहे. सुरक्षा व्यवस्थेत थोडीही चूक झाली तर चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागणार आहे.