T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत काल भारत-पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या 45 मिनिटात टीम इंडियाने फक्त सामनाच जिंकला नाही, तर क्रिकेट चाहत्यांना खेळाचा सर्वोत्तम थरार अनुभवता आला. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा विजय खूप खास आहे. कारण टीम इंडियाने पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताला काल मोठी मजल मारता आली नाही. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी फक्त 120 धावांच टार्गेट दिलं होतं. T20 मध्ये चेज करण्यासाठी 120 ही फार मोठी धावसंख्या नाही. एकवेळ तर पाकिस्तान ही धावसंख्या सहज पार करेल असं चित्र होतं. त्यामुळे टीम इंडियाने एकदम विपरित, प्रतिकुल परिस्थितीतून हा विजय मिळवलाय. टीम इंडियाने अशक्य वाटणारी गोष्टी शक्य करुन दाखवली. याच सगळ श्रेय जातं, गोलंदाजांना खासकरुन जसप्रीत बुमराहला. टीम इंडियासाठी विजयाचे चान्सेस होते फक्त 2 टक्के तिथून भारताने बाजी पलटवली.
कल्पना करा, तुमची टीम जिंकण्याची शक्यता आहे, फक्त 2.48 टक्के आणि टीम या परिस्थितीतून, सगळ्या अडचणींवर मात करुन जिंकते, हे विशेष नाहीय का?. भारतीय क्रिकेट संघाने आज हा जो विजय मिळवलाय, तो म्हणून खास आहे. दुसऱ्या इनिंगच्या 11 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानी टीम विजयाच्या मार्गावर होती. पण त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण खेळच पालटला. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी टीमने चांगली, सावध सुरुवाती केली होती. 11 ओव्हरमध्ये त्यांच्या 2 बाद 66 धावा होत्या. 54 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 54 धावांची गरज होती. त्यांच्या विजयाचे चान्सेस होते, 97.52%.
फक्त 45 मिनिट लागली
12 ओव्हरनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीच कंबरड मोडलं. फलंदाजी अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांकडून विशेष कामगिरी अपेक्षित होती, ज्या कसोटीवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सिद्ध केलं. टीम इंडियाने सामना आपल्या बाजूने झुकवायला फक्त 45 मिनिट घेतली. फखर झमन, शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांनी पॅव्हेलियनची वाट धरली. अखेरीस टीम इंडियाने 6 धावांनी विजय मिळवला.