पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने 2024-25 साठी पाकिस्तान नॅशनल टीमच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान यजमान आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंची तयारी लक्षात घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी खास व्यवस्था केली आहे. टुर्नामेंटच्यावेळी टीमला याचा फायदा होऊ शकतो.
पाकिस्तानी टीम आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी मायदेशात बांग्लादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांविरुद्ध सात टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी पाकिस्तान एक तिरंगी मालिका सुद्धा खेळणार आहे. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन संघात तिरंगी मालिका होईल. 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मुल्तानमध्ये ही ट्राय सीरीज होईल. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. पाकिस्तानी टीम या सीरीजच्या माध्यमातून आपल्या तयारीची चाचपणी करणार आहे.
कसा असेल कार्यक्रम?
पाकिस्तान 2024-25 च्या सीजनची सुरुवात बांग्लादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. पहिली टेस्ट रावळपिंडी येथे 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान आणि दुसरी टेस्ट मॅच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होईल. 7 ते 28 ऑक्टोबर दरम्यान इंग्लंडची टीम पाकिस्तानातयेईल. यावेळी दोन्ही टीममध्ये 3 टेस्ट मॅचची सीरीज होईल. 16 जानेवारी 2025 ते 28 जानेवारी दरम्यान पाकिस्तानी टीम वेस्ट इंडिजचा दौरा करेल.
कुठल्या-कुठल्या देशांविरुद्ध खेळणार?
मायदेशात खेळण्याशिवाय पाकिस्तानी टीम 4 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा दौरा करणार आहे. यात दोन टेस्ट, नऊ वनडे आणि नऊ T20 सामने खेळणार आहे. पाकिस्तानी टीम 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात 3 वनडे आणि 3 T20 मॅच खेळणार आहे. त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये तीन वनडे आणि तितकेच टी 20 सामने खेळणार आहे. झिमाब्वेचा हा दौरा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान आहे. त्यानंतर पाकिस्तानी टीम दक्षिण आफ्रीकेला जाईल. 10 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत 3 टी20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मॅच खेळणार आहे.