पर्थ: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये धक्कादायक निकालांची मालिका सुरुच आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका, इंग्लंडनंतर आता पाकिस्तानला पराभवाचा झटका बसला आहे. पर्थमध्ये पाकिस्तानसोबत धक्कादायक घडलं. त्यामुळे त्यांचा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय. झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न धुसर झालय. मात्र पाकिस्तानकडे अजून एक संधी आहे.
जाणून घ्या पूर्ण समीकरण
पाकिस्तानची टीम अजूनही टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. तुम्ही विचार करत असाल, पाकिस्तानने सुरुवातीचे दोन सामने गमावलेत. मग ते सेमीफायनलमध्ये कसे पोहोचू शकतात? जाणून घ्या पूर्ण समीकरण.
सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार पाकिस्तानची टीम?
पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळलाय. दोनही मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झालाय. पण अजून त्यांचे 3 सामने बाकी आहेत. सर्वप्रथम पाकिस्तानला आपले तिन्ही सामने जिंकावे लागतील. बांग्लादेश, नेदरलँड शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचे सामने बाकी आहेत. पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 6 पॉइंट होतील. नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी विजयाच अंतरही मोठं ठेवाव लागणार आहे.
पाकिस्तानची अपेक्षा असेल की….
एखाद्या दुबळ्या संघाकडून भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव झाला पाहिजे, अशी पाकिस्तानची अपेक्षा असेल. टीम इंडिया दोन्ही मॅच जिंकून ग्रुपमध्ये अव्वल आहे. टीम इंडियाचे बांग्लादेश, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने बाकी आहेत. टीम इंडियाने दोन मॅच जरी जिंकल्या, तरी ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
दक्षिण आफ्रिकेच वर्ल्ड कपमधील अभियान कसं थांबू शकतं?
दक्षिण आफ्रिकेचे अजूनही तीन सामने बाकी आहेत. त्यांनी अजून दोन सामने जरी जिंकले, तरी त्यांची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाने पराभव करावा, अशी पाकिस्तानची अपेक्षा असेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वे किंवा नेदरलँडकडून पराभव झाला पाहिजे किंवा पावासमुळे सामना रद्द व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा असेल.
क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं
दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारतानेही त्यांना पराभूत केलं, तर त्यांचे फक्त 5 गुण होतील, असं घडण्याची शक्यता फार कमी आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं.