लाहोर: सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात (Pakistan vs Australia, 3rd Test) लाहोरमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा दुसरा दिवस आहे. सामन्या दरम्यान आज मैदानावर अशी एक घटना घडली, जी पाहून मैदानावरील सर्वच जण दंग झाले. फक्त चाहतेच नाही, तर मैदानावरील पाकिस्तानी खेळाडू, ऑस्ट्रेलियन फलंदाजही हैराण झाले. मैदानावर अनेकदा पहायला मिळतं की, चेंडू स्टम्पला लागून जातो पण बेल्स पडत नाहीत. आज पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान अजबच घडलं. वेगवान गोलंदाज हसन अलीच्या (hasan ali) अप्रतिम स्विंगिंग यॉर्कर चेंडूने एलेक्स कॅरीला(Alex Carey) चकवलं. चेंडू थेट ऑफ स्टंम्पला लागला पण बेल्स पडल्या नाहीत. हसन अलीचा यॉर्कर चेंडू कॅरीच्या बॅट आणि पॅडमधून गेला. चेंडूने ऑफ स्टंपला स्पर्श केला पण बेल्स पडल्या नाहीत.
धक्का कधी बसला?
जेव्हा पाकिस्तानी पंच अलीम दार यांनी एलेक्स कॅरी बाद असल्याचं जाहीर केलं, तेव्हा सर्वांना धक्का बसला. कॅरीला त्यांनी कॅच आऊट दिलं. चेंडूने एलेक्स कॅरीच्या बॅटला स्पर्श केलाय आणि विकेटकीपर मोहम्मद रिजवानने झेल घेतला, असं दार यांना वाटलं.
कॅरीला मिळालं जीवदान
हसन अलीचा चेंडू ऑफ स्टंपला स्पर्श करुन रिजवानच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पण त्याआधी चेंडूने जमिनीला स्पर्श केला होता. पण अलीम दार यांना हे लक्षातचं आलं नाही. त्यांनी खूप खराब निर्णय देताना कॅरीला बाद दिलं. कॅरीने रिव्ह्यू घेतल्यानंतर अलीम दार यांचा निर्णय चुकल्याचं स्पष्ट झालं.
Not sure y this was given out caught behind it’s clearly bounced before the keepers Aleem Dar up to his old tricks again pic.twitter.com/CgtHu41AmV
— Matt Walker (@MattLeeWalker88) March 22, 2022
कॅरी-ग्रीनने संभाळला ऑस्ट्रेलियाचा डाव
लाहोर कसोटीच्या दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती थोडी खराब होती. हेड पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो 26 धावांवर आऊट झाला. त्यानंतर कॅंमरन ग्रीन आणि एलेक्स कॅरीने शतकी भागीदारी केली व पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. दोघांनी लंच पर्यंत 210 चेंडूत 114 धावांची भागीदारी केली. कॅरी आणि ग्रीन दोघांनी अर्धशतक झळकावली.