एडिलेड: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं, ते उगाच नाही. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. आज असेच धक्कादायक निकाल पहायला मिळाले. रविवारची सकाळ क्रिकेटप्रेमींना अशीच धक्का देऊन गेली. कोणीही कल्पना केली नसेल, असा चत्मकारिक निकाल पहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँडस सामन्यात नेदरलँडस दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण असंच घडल. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडसने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.
टीम इंडिया मॅचआधीच सेमीफायनलमध्ये
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग अजून सोपा झाला. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असता, ग्रुप 2 मध्ये रंगत कायम राहिली असती. पण या पराभवामुळे ग्रुप 2 मधून भारत आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला.
दोन्ही टीम्ससाठी ‘करो या मरो’ मॅच
पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील सामना फक्त जय-पराजयापुरता मर्यादीत ठरला. रनरेटची चुरसच निघून गेली. ज्या पाकिस्तानच टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय, अशी चर्चा होती. त्याच पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तान आणि बांग्लादेश दोन्ही टीम्ससाठी आजची मॅच ‘करो या मरो’ होती. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये आणि हरणाऱ्या टीमच आव्हान संपणार असा साधा सरळ हिशोब होता.
टीम | सामने | विजय | पराजय | रनरेट | पॉइंट्स |
---|---|---|---|---|---|
भारत | 4 | 3 | 1 | +0.730 | 6 |
पाकिस्तान | 5 | 3 | 2 | +1.028 | 6 |
दक्षिण आफ्रिका | 5 | 2 | 2 | +0.874 | 5 |
नेदरलँड्स | 5 | 2 | 3 | -0.849 | 4 |
बांग्लादेश | 5 | 2 | 3 | -1.176 | 4 |
झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | -0.313 | 3 |
आता फक्त टॉपवर कोण राहणार? त्याची उत्सुक्ता
अखेर या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्सने बाजी मारली. या विजयासह पाकिस्तानचे 6 पॉइंटस झाले आहेत. आता ग्रुप मध्ये टॉपवर कोण राहणार? याची उत्सुकता आहे. भारताने झिम्बाब्वेला नमवलं, तर टीम इंडिया टॉपवर आणि भारत हरल्यास रनरेटच्या आधारावर पाकिस्तान टॉपवर राहू शकते.
बांग्लादेशकडून कोणी धावा केल्या?
आज महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने आपल्या कामगिरीचा स्तर उंचावला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आज आपल काम चोख बजावलं. त्यांनी बांग्लादेशच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 127 धावांवर रोखलं. बांग्लादेशकडून नजमुल शांतोने 48 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. यात 7 चौकार होते.
पाकिस्तानची सावध सुरुवात
विजयासाठी 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानने सावध-संयमी सुरुवात केली. बाबर आजम आणि मोहम्मर रिजवानने 57 धावांची सलामी दिली. रिजवान 32 आणि बाबर 25 धावांवर बाद झाला. शान मसूदने 22 धावांवर नाबाद राहून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.