मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानची (IND vs PAK) टीम पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. रविवारी 4 सप्टेंबरला दोन्ही टीम्स मध्ये मॅच होणार आहे. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगवर (Hong Kong) मोठा विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने आशिया कपच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. आठवड्याभराच्या आत दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे.
मोहम्मद रिजवान, खुशदिल शाह आणि शादाब खानने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानने हाँगकाँगवर 155 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानने हाँगकाँगला विजयासाठी 194 धावांचं टार्गेट दिलं होतं. पण पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर हाँगकाँगची संपूर्ण टीम फक्त 38 धावात ऑलआऊट झाली.
शारजाह मध्ये शुक्रवारी ग्रुप राऊंडचा शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार होता. पाकिस्तान आणि हाँगकाँगला भारताने पराभूत केलं होतं. पाकिस्तान आधीपासूनच या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार होता. त्यांनी खेळही तसाच दाखवला. पाकिस्तानने आधी विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजीच्या बळावर हाँगकाँगचा डाव झटपट गुंडाळला. टी 20 क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा हा मोठा विजय आहे.
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. भारताविरोधात बाबरने फक्त 10 धावा केल्या होत्या. बाबरने या सामन्यात फक्त 9 धावा केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्येच तो पॅव्हेलियन मध्ये परतला. ऑफ स्पिनर एहसान खानने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेतला. एहसानने दुसऱ्यांदा बाबरची विकेट काढली. त्यानंतर रिजवान आणि फखर जमांने पाकिस्तानचा डाव सावरला.
आधी धीम्या गतीने फलंदाजी केली. पण त्यानंतर रिजवान-फखरने धावगती वाढवली. दुसऱ्याविकेटसाठी 80 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. रिजवानने 43 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. फखरने 38 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली.
पाकिस्तानने 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हाँगकाँगचा एकही फलंदाज या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. हाँगकाँगची संपूर्ण टीम 38 धावात ऑलआऊट झाली. पाकिस्तानचा शादाब खान यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 4 विकेट घेतले.