PAK vs ZIM: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला मोठा झटका, दुबळ्या झिम्बाब्वेने हरवलं

| Updated on: Oct 27, 2022 | 8:26 PM

PAK vs ZIM: पाकिस्तानच्या टीमचा वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा पराभव

PAK vs ZIM: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला मोठा झटका, दुबळ्या झिम्बाब्वेने हरवलं
Pakistan Team
Image Credit source: PCB
Follow us on

पर्थ: पाकिस्तानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा झटका बसला आहे. दुबळ्या झिम्बाब्वेने पाकिस्तानवर 1 रन्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या टीमने पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांच लक्ष्य दिलं होतं. टी 20 क्रिकेटचा विचार करता, हे सोपं लक्ष्य होतं. पण पाकिस्तानी टीमला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 129 धावाच करता आल्या.

शाहीन शाह आफ्रिदी रनआऊट

पाकिस्तानची टीम आज टी 20 वर्ल्ड कपमधला दुसरा सामना खेळली. पर्थमध्ये हा सामना झाला. झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने 1 रन्स काढला. दुसरी धाव घेताना तो रनआऊट झाला. सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण झालाय. कारण आधी त्यांना भारताने पराभूत केलं.

‘या’ तीन गोलंदाजांनी पाकिस्तानची लावली वाट

पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 44 धावा केल्या. मोहम्मद रिजवान (14) आणि बाबर आजम (4) पुन्हा अपयशी ठरले. बाबर चौथ्या आणि रिजवान पाचव्या ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या फक्त 23 होती. रिचर्ड एनगवारा, ब्रॅड इवान्स आणि ब्लेसिंग मुजरबानी या तीन वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानची वाट लावली. आठव्या ओव्हरमध्ये इफ्तिखार अहमद सुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतला.

झिम्बाब्वेची आक्रमक सुरुवात

पर्थमध्ये सुपर 12 राऊंडमध्ये झिम्बाब्वेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. कॅप्टन क्रेग इरविन आणि वेसली मधवेरीने जोडीने जोरदार सुरुवात केली. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा कुटल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 रन्स केल्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 38 धावा केल्या होत्या.

वसीम-शादाबने झिम्बाब्वेला रोखलं

पाचव्या ओव्हरमध्ये हॅरिस रौफनवे झिम्बाब्वेची पहिली विकेट काढली. त्यानंतर हळूहळू त्यांची धावगती मंदावली. वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीन ज्यूनियरने चांगलं प्रदर्शन केलं. त्याने 4 विकेट काढल्या. शादाब खान आणि हॅरिस रौफने झिम्बाब्वेच्या धावगतीला लगाम घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे झिम्बाब्वेला 20 ओव्हरमध्ये 130 धावांवर रोखलं.