केपटाऊन: तीन कसोटी सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशी जिंकली असली, तरी DRS सिस्टिमवरुन या कसोटीत झालेला वाद बराच गाजला. काल अश्विनच्या (Ashwin) गोलंदाजीवर डीन एल्गरची विकेट आणि आज डुसेला नाबाद ठरवण्याचा निर्णय यावरुन बरेच वाद झाले. एल्गरला कसोटीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर DRS सिस्टिमच्या आधारे तिसऱ्या पंचांनी नाबाद ठरवले. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली, (Virat Kohli) रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुलने स्टंम्पजवळच्या माईकवर जाऊन आपला राग व्यक्त केला.
त्यावर बरीच टीकही सुरु आहे. या संपूर्ण वादावर आता कोहली व्यक्त झाला आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांचा बचाव केला. “मैदानावर काय सुरु असतं, ते बाहेर बसलेल्या लोकांना माहित नसतं” असं विराटने म्हटलं आहे.
तर तो सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला असता
सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटला DRS बद्दल विचारण्यात आलं. त्यावर मला आता यावर काही बोलायचं नाही असं त्याने सांगितलं. “मला यावर काही बोलायचं नाही. मैदानावर काय झालं, ते आम्हाला माहित आहे. बाहेरच्या लोकांना मैदानावर काय घडतं, ते नीट समजू शकत नाही. आम्ही तिथे तीन विकेट घेतले असते, तर तो सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला असता. आम्ही त्यांच्यावर दीर्घकाळासाठी दबाव टाकू शकलो नाही. त्यामुळे आम्ही सामना गमावला” असे कोहलीने सांगितले.
मला वाद वाढवायचा नाही
“मी आणि माझा संघ पुढे गेलोय. यावरुन आम्हाला कुठला नवीन वाद निर्माण करायचा नाही. मला वाद निर्माण करण्यात रस नाही. तो क्षण गेलाय आणि आम्ही पुढे गेलोय. आमचे लक्ष फक्त खेळावर आहे. आम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न केला” असे कोहलीने सांगितले.
मैदानात नेमकं काय घडलं?
तिसऱ्यादिवसाच्या अखेरच्या सत्रात डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडली जमली होती. ते संघाला विजयी लक्ष्याच्या दिशेने नेत होते. त्याचवेळी अश्विनच्या एका चेंडूवर एल्गरला फसला. भारतीय संघाने पायचीतचे अपील करताच मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी एल्गरला आऊट दिले.
एल्गरने रिव्ह्युचा निर्णय घेतला. पण मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला जाईल, असे त्याला वाटत नव्हते. रिप्ले पाहिल्यानंतर एल्गर ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला होता. बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीने चेंडू स्टंम्पसवरुन जातोय, असं दाखवलं.
आर. अश्विन, विराट कोहली आणि केएल राहुलला बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीवर विश्वास बसला नाही. तिसऱ्या पंचांनी एल्गरला नाबाद ठरवलं. त्यानंतर या तिघांनी स्टंम्पजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला. जेणेकरुन सर्वांना समजेल. खरंतर हे टाळता आलं असतं.