मुंबई: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर (Jos buttler) IPL 2022 चा सीजन गाजवतोय. त्याने आतापर्यंत 15 डावात 718 धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप (Orange Cap) त्याच्याकडे आहे. सीजनच्या शेवटी ऑरेंज कॅपचा मानकरी तोच असेल, अशी शक्यता आहे. बटलरने या सीजनमध्ये तीन शतक झळकावली आहेत. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. गुजरात टायटन्स विरुद्धच्या क्वालिफायर 1 च्या सामन्यातही त्याने 89 धावांची शानदार खेळी केली होती. आज IPL 2022 चा दुसरा क्वालिफायर सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये हे दोन संघ आमने-सामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) सामना सुरु आहे. आजही जोस बटलरकडून राजस्थानला भरपूर अपेक्षा आहे. त्याची बॅट तळपली तर राजस्थानसाठी विजयाचं गणित सोप बनतं.
आजही राजस्थानच्या संघाला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे जोस बटलरच्या बॅटिंग मध्ये पूर्णपणे क्रिकेटिंग शॉटस असतात. कुठेही आडवे-तिडवे फटके पहायला मिळत नाहीत. आजही बटलरकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. ही कॅप सध्या बटलरकडे आहे. केएल राहुल 616 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण लखनौचं आव्हान आता संपुष्टात आलं आहे. त्यामुळे बटलरच्या कॅपला सध्यातरी धोका नाही.
जोस बटलर जेव्हा मोठे फटके खेळतो किंवा एखादा रेकॉर्ड करतो, तेव्हा कॅमरा प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांकडे जातो. त्यावेळी अनेकांना लारा वॅन डर डुसे जोस बटलरची बायको वाटते. खरंतर लारा ही दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू रासी वॅन डर डुसेची बायको आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये ती नेहमी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसते.
राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये बोलताना लाराने हा गोंधळ दूर केला, गमतीने तिने यावेळी जोसला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं सांगितलं. मागच्याय आठवड्यात बटलरची पत्नी आणि मुलं बायो-बबलमध्ये दाखल झाली.