Mohammad Rizwan injured : पाकिस्तान सुपर लीगच्या 20 व्या सामन्यात मोहम्मद रिजवानसोबत एक वेदनादायी घटना घडली. बॅटिंग करताना मोहम्मद रिजवानला जोरात चेंडू लागला. त्यानंतर त्याला हातातली बॅट सोडून पळाव लागलं. मुल्तान सुल्तांसच्या या कॅप्टनला पाचव्या ओव्हरमध्ये हॅरिस रौफच्या चेंडूवर मार लागला. मोहम्मद रिजवान हॅरिस रौफने टाकलेला वेगवान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी चेंडू रिजवानच्या हाताच्या कोपराला लागला. चेंडू बसल्यानंतर बॅट रिजवानच्या हातातून खाली पडली. चेंडू लागल्यामुळे होणाऱ्या वेदना रिजवानच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.
मोहम्मद रिजवानला होणाऱ्या वेदना पाहून प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या मदतीला धावला. त्याने रिजवानच्या हाताचा कोपरा तपासला. त्यानंतर काहीवेळासाठी सामना थांबवावा लागला. रिजवानच्या फिजियोने सुद्धा तपासणी केली. पण सुदैवाने त्याला मोठा मार लागला नाही
रिजवान फेल, सुल्तांसचा पराभव
मोहम्मद रिजवानला या मॅचमध्ये दुखापत झालीच. पण त्याच बरोबर त्याच्या टीमचाही पराभव झाला. लाहोर कलंदर्सने मुल्तानला 181 धावांच टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तरात मुलतानच्या टीमने फक्त 159 धावा केल्या. रिजवान 27 चेंडूत 30 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रुसो आणि डेविट मिलरची बॅट चालली नाही. अखेरीस पोलार्डने 39 धावा केल्या. पण टीमचा 21 धावांनी पराभव झाला.
मुल्तानचा तिसरा पराभव
मुल्तान सुल्तांनचा पीएसएलच्या या सीजनमधील हा तिसरा पराभव आहे. टीमने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यात चार विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. लाहोर कलंदर्सने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. सॅम बिलिंग्सने 54 धावा करुन लाहोर कलंदर्सच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. अब्दुलाह शफीकने 48 धावा केल्या. त्याशिवाय राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 15 धावा देऊन 3 विकेट काढल्या. या खेळाडूने आपल्या 4 ओव्हरमध्ये एकही चौकार किंवा षटकार दिला नाही. राशिद खानला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.