पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये शुक्रवारपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) मध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला एक वाईट बातमी मिळाली आहे. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) दुखापतीमुळे पहिल्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. रवींद्र जाडेजाला वनडे संघाचं उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. पण तोच खेळण्याची शक्यता कमी आहे. जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर हेड कोच राहुल द्रविड यांनी एका नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला संघासोबत जोडलं आहे.
पोर्ट ऑफ स्पेन येथे इनडोर प्रॅक्टिस सुरु होण्याआधी रवींद्र जाडेजाला दुखापत झाल्याचं समोर आलं. त्यानंतर हेड कोच राहुल द्रविड यांनी तिथल्या लोकल टॅलेंटला प्रॅक्टिससाठी बोलावलं. यात आमिर अली हा खेळाडू होता. 20 वर्षाचा हा खेळाडू डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. आमिर अलीने 30 मिनिटं भारतीय फलंदाजांना गोलंदाजी केली. त्यानंतर राहुल द्रविड या खेळाडूसोबत चर्चा करताना दिसले.
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज अकील हुसैनमुळे आमिर अलीला प्रॅक्टिस सेशनसाठी बोलवण्यात आलं. मागच्यावेळी भारतीय संघाचा जेव्हा वेस्ट इंडिज विरुद्ध सामना झाला होता, तेव्हा हा 28 वर्षाचा फिरकी गोलंदाज अकीलने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता. 2 वनडे सामन्यात त्याचा इकॉनमी रेट 5.67 होता. भारताचा एकही फलंदाज त्याच्याविरोधात षटकार ठोकू शकला नव्हता. भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले होते. वेस्ट इंडिजला सुद्धा ही गोष्ट माहित आहे. विंडीजने आणखी एक फिरकी गोलंदाज गुडाकेश मोटीला संघात स्थान दिलं आहे. या गोलंदाजाने बांगलादेश विरुद्ध तीन वनडे सामन्यात 6 विकेट मिळवल्या होत्या.
टीम इंडिया: शिखर धवन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, इशान किशन, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.