कोलकाता: टीम इंडियाने गुरुवारी इडन गार्डन्सवरील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेला हरवलं. या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी सर्व चांगल घडत असताना, एक चिंतेची बाब आहे. टीमचे हेड कोच राहुल द्रविड तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी टीमसोबत जाणार नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड यांची तब्येत ठीक नाहीय. म्हणूनच कोलकातावरुन ते थेट बंगळुरुला आपल्या घरी रवाना झालेत.
तिसरा सामना औपचारिकता मात्र
तिसरा सामना भारतासाठी फक्त औपचारिकता मात्र असेल. कारण भारताने सीरीज आधीच जिंकली आहे. तिसऱ्या मॅचच्या निकालाचा सीरीच्या रिझल्टवर परिणाम होणार नाही. श्रीलंकेची टीम दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
द्रविड यांना काय त्रास झाला?
दुसऱ्या मॅच दरम्यान हॉटेलमध्ये असताना, राहुल द्रविड यांना ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता. मॅच दरम्यान ते ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित होते. बंगाल क्रिकेट संघटनेने राहुल द्रविड यांच्यासाठी डॉक्टर उपलब्ध करुन दिला. त्यांच्या प्रकृतीला आराम पडला. आता ते बंगळुरुला जाऊन उपचार घेतील. डॉक्टरने हिरवा कंदिल दाखवला, तर ते 15 जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी उपस्थित राहतील.
कोलकातामध्ये साजरा केला बर्थ डे
राहुल द्रविड यांनी दोन दिवस आधी आपला वाढदिवस साजरा केला. 11 जानेवारीला ते कोलकाता येथे पोहोचले, त्यावेळी टीमने हॉटेलमध्ये केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. टीम इंडियाशिवाय क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून त्यांना बर्थ डे गिफ्ट सुद्धा दिलं. भारताने चार विकेटने हा सामना जिकंला.
अशी जिंकली मॅच
श्रीलंकेच्या टीमने पहिली बॅटिंग केली. पण ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कुलदीप यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या बॉलर्सनी श्रीलंकेला 215 धावांवर रोखलं. भारताने हे सोप लक्ष्य 43.2 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून पूर्ण केलं. कुलदीपने या मॅचमध्ये तीन विकेट काढल्या. केएल राहुलच्या संयमी फलंदाजीमुळे टीम इंडियाने हा विजय मिळवला. त्याने 103 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. हार्दिक पंड्याने 36 रन्स केल्या. अक्षर पटेलने 21 धावांच योगदान दिलं.