मुंबई: भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) मध्ये काल झालेला दुसरा टी 20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने आयर्लंड सारख्या कमकुवत संघाविरुद्ध अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. खरंतर काल आयर्लंडने थोडा अजून चांगला खेळ दाखवला असता, तर निकालाचं चित्र वेगळ दिसलं असतं. भारताने आयर्लंड विरुद्धची ही दोन टी 20 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं होतं. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी तुलनेने दुय्यम संघ निवडला होता. कारण आयर्लंड मध्ये मालिका सुरु असताना, दुसरा संघ इंग्लंडमध्ये सराव (India England Tour) करतोय. इंग्लंड विरुद्ध येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. सगळे सीनियर खेळाडू या टीम मध्ये आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ निवडले होते. आयर्लंड दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. यात उमरान मलिक, अर्शदीप सिंह, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
भारत इंग्लंडमध्ये कसोटी सामना झाल्यानंतर तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे एक कसोटी सामना रद्द झाला होता. तो हा कसोटी सामना आहे. कसोटी सामन्यासाठी संघ आधीच निवडण्यात आला आहे. पण इंग्लंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ निवड अजून झालेली नाही. आयर्लंड दौऱ्यावरील काही खेळाडूंचा वनडे आणि टी 20 संघात समावेश होऊ शकतो.
आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या हार्दिक पंड्याससह काही खेळाडूंना आयर्लंड मध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. बाकीचे खेळाडू मायदेशी परततील. वेंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, राहुल त्रिपाठी आणि रवी बिश्नोई हे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. अन्य खेळाडूंना तिथेच थांबण्यास सांगण्यात आले आहे. स्पोर्ट्स टायगरने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
आयर्लंडमधील टी 20 सीरीजसाठी जे नवीन खेळाडू निवडण्यात आले होते. त्यात फक्त उमरान मलिकला थांबण्यास सांगितलं आहे. याचाच अर्थ बीसीसीआयची निवड समिती उमरान मलिकचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्याचा विचार करत आहे. आयर्लंडच्या विरुद्धच्या विजयात काल उमरान मलिक हिरो ठरला. त्याने चार षटकात 42 धावा दिल्या. पण शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा करु दिल्या नाहीत.