जयपूर : प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला. RCB ला राजस्थान विरुद्ध महाविजयाची आवश्यकता होती. तसाच दिमाखदार विजय आरसीबीने मिळवला. संपूर्ण सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सची टीम खेळतेय, असं वाटलंच नाही. बँगलोरने राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला आहे.
या विजयामुळे RCB ने प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलय. तेच राजस्थान रॉयल्सच स्वप्न भंगल आहे. आरसीबीने तब्बल 11 वर्षानंतर राजस्थान विरुद्ध जयपूरमध्ये सामना जिंकला. याआधी 2012 साली RCB ने जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध विजय मिळवला होता.
तिसरी नीचांकी टोटल
RCB ने ही मॅच 112 धावांनी जिंकली आहे. आरसीबीच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाची टीम 59 रन्सवर ऑलआऊट झाली. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान टीमने नोंदवलेली ही तिसरी नीचांकी टोटल आहे. फाफ डु प्लेसी, ग्लेन मॅक्सवेल आणि वेन पार्नेल RCB च्या विजयाचे शिल्पकार ठरले.
वेन पार्नेलची भेदक गोलंदाजी
RCB च्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने यशस्वी जैस्वालला कोहलीकरवी कॅच आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज वेन पार्नेलने राजस्थानला जोस बटलर आणि कॅप्टन संजू सॅमसनच्या रुपाने दोन झटके दिले. बटलर शुन्यावर तर सॅमसनला 4 धावांवर बाद केलं.
फक्त हेटमायर खेळला
पावरप्लेमध्येच राजस्थानचा निम्मा संघ तंबूत परतला होता. 5 बाद 28 अशी त्यांची स्थिती होती. राजस्थानकडून फक्त शिमरॉन हेटमायरने प्रतिकार केला. त्याने 19 चेंडूत 35 धावा करताना 1 फोर आणि 4 सिक्स मारले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर ब्रेसवेलने हेटमायरची कॅच पकडली. तो बाद झाल्यानंतर राजस्थानच्या आशा संपुष्टात आल्या. 10.2 ओव्हर्समध्ये राजस्थानचा डाव 59 धावांवर आटोपला. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना वेन पार्नेलने आपलं काम चोख बजावलं. त्याने 3 ओव्हर्समध्ये 10 धावा देताना 3 विकेट काढल्या.
RCB ने पहिली बॅटिंग केली. कॅप्टन फाफ डु प्लेसी (55) आणि ग्लेन मॅक्सवेलने (54) हाफ सेंच्युरी झळकवली. रावतने 11 चेंडूत नाबाद (29) आणि ब्रेसवेलने 9 चेंडूत नाबाद (9) धावा केल्या. केएम असीफने लास्ट ओव्हर टाकली. रावतने शेवटच्या तीन चेंडूंवर 6,6,4 धावा वसूल केल्या. त्यामुळे RCB ची टीम 170 च्या पुढे गेली.