मुंबई: आजपासून देशात रणजी सीजनला (Ranji season) सुरुवात झाली आहे. मुंबईचा सौराष्ट्राविरुद्ध तर महाराष्ट्राचा आसाम (Maharashtra vs Assam) विरुद्ध सामना सुरु आहे. सलामीवीर पवन शाहच्या (Pavan shah) नाबाद 165 धावांच्या खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर पाच बाद 278 धावा केल्या आहेत. पुण्याच्या पवन व्यतिरिक्त महाराष्ट्राचे अन्य फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. महाराष्ट्र आणि आसामचा ग्रुप जी मध्ये समावेश आहे. रोहतकमध्ये हा चार दिवसीय सामना खेळवला जात आहे. पुण्याच्या पवनने 275 चेंडूत नाबाद 165 धावांची खेळी करताना 15 चौकार आणि एक षटकार लगावला. पवनने चौफेर फटकेबाजी करत आसामच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. खेळपट्टी पाहून आसामच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पवनने आसामच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही.
अंकित बावने मोठी खेळी करु शकला नाही
या 22 वर्षीय मुलाने सहजतेने फलंदाजी केली. मुख्तार हुसैन आसामचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 23 षटकात 61 धावा देत तीन विकेट घेतल्या. संघाच्या 100 धावा होण्यापूर्वीच महाराष्ट्राचे तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. पण पवन खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. यश नाहर अवघ्या 4 धावांवर बोल्ड झाला. राहुल त्रिपाठी दोन आणि कर्णधार अंकित बावनेने 27 धावा केल्या. त्याला मुख्तार हुसैनने पायचीत पकडलं. नौशाद शेखने 28 आणि विशांत मोरेने 16 धावा केल्या. दिव्यांग हिंगणेकरने 36 धावांवर नाबाद आहे. पवन आणि दिव्यांगमध्ये नाबाद 94 धावांची भागीदारी झाली आहे. उद्या दुसरा दिवस असून पवनचा उद्या द्विशतक झळकावण्याचा प्रयत्न असेल.
दोन फेजमध्ये रणजी स्पर्धा
रणजी करंडक स्पर्धेचं दोन फेजमध्ये आयोजन होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 17 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान सामने होतील. रणजीच्या प्री क्वार्टर फायनलआधी तीन राऊंडचे सामने होतील. पहिला राऊंड 17 ते 20 फेब्रुवारी, दुसरा राऊंड 24 ते 27 फेब्रुवारी आणि तिसरा राऊंड 3 ते 6 मार्च दरम्यान खेळवला जाईल. दुसऱ्या फेजमध्ये नॉकाआऊट सामने होतील. 30 मे पासून दुसऱ्या फेजचे सामने सुरु होण्याची शक्यता आहे.