बंगळुरु: यंदाच्या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन करुन मुंबईचा संघ (Mumbai Team) रणजी करंडक (Ranji Final) स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचला आहे. मुंबई समोर मध्य प्रदेशचं आव्हान आहे. मुंबईचा संघ 42 वं रणजी विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. मुंबई संघाचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. मुंबई संघाला रणजीच्या फायनलमध्ये पोहोचवण्यात या युवा खेळाडूंच सर्वात जास्त योगदान आहे. सर्फराज खान, (Sarfaraz khan) यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, सुवेद पारकर आणि हार्दिक तामोरे सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. सर्फराज खानकडून मुंबईला भरपूर अपेक्षा आहेत. मागच्या पाच सामन्यात त्याने 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून सलामीला येणाऱ्या यशस्वी जैस्वालने मागच्या चार सामन्यात तीन शतकं ठोकली आहेत. उत्तर प्रदेश विरुद्ध सेमी फायनल मॅचमध्ये यशस्वीची शतकी खेळी लाजबाव होती. कॅप्टन पृथ्वी शॉ ला अजून त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. नुकताच आयर्लंडमधल्या दोन टी 20 सामन्यासाठी संघ जाहीर झाला. त्यात पृथ्वीची निवड झालेली नाही.
शालेय स्तरावरील क्रिकेटपासून पृथ्वी शॉ च्या नावाची चर्चा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर तो मागे पडला. या रणजी सीजनमध्ये त्याला फक्त तीन शतक झळकावता आली आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉ सुद्धा फायलनमध्ये जोरदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.
गोलंदाजीमध्ये मुंबईची मदार शम्स मुलानी आणि ऑफ स्पिन्र तनुष कोटियनवर आहे. दोघांनी या सीजनमध्ये अनुक्रमे 37 आणि 18 विकेट घेतल्या आहेत. मध्य प्रदेशची मदार प्रामुख्याने डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयवर आहे. हा खेळाडू आयपीएलमध्ये अखेरच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मध्य प्रदेशच्या संघाला वेगवान गोलंदाज आवेश खानची उणीव जाणवेल. आवेश खान सध्या भारतीय संघातून खेळत असून तो आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
The ?????? from Mumbai are behind the team ?
Ahead of Mumbai’s 4⃣7⃣th #RanjiTrophy final, drop a ? and show your support for the Mum-Boys ?#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI #RanjiTrophy2022 pic.twitter.com/LarbSVxBkt
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) June 21, 2022
या रणजी फायनलचं वैशिष्ट्य म्हणजे दोन मुंबईकर प्रशिक्षक फायनलमध्ये पोहोचलेल्या संघाचे मार्गदर्शक आहेत. अमोल मुझुमदार मुंबईचे, तर चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आहेत. पृथ्वी शॉ ने मुंबईच्या रणजी संघातून डेब्यु केला, त्यावेळी चंद्रकांत पंडित मुंबईचे प्रशिक्षक होते. अमोल मुझुमदार हे सुद्धा एक मोठ नाव आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे दोन प्रशिक्षकांमधल्या रणनितीचा सुद्धा हा सामना असेल.