मुंबई: मध्य प्रदेशच्या संघाने आज मुंबईला (MUM vs MP) दमदार प्रत्युत्तर दिलं. रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशचा संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. आज तिसऱ्यादिवसाच्या खेळावर पूर्णपणे मध्य प्रदेशने वर्चस्व गाजवलं. मुंबईचा संघ बॅकफूटवर ढकलला गेलाय. 42 व्या रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी मुंबईच्या टीमला उद्या आपली कामगिरी कमालीची उंचावावी लागेल. मध्य प्रदेशकडून यश दुबे आणि शुभम शर्मा यांनी शानदार शतकं झळकावली. दोघांनी दुसऱ्याविकेटसाठी तब्बल 222 धावांची भागीदारी केली. मध्य प्रदेशकडून यश दुबेने (Yash dubey) 336 चेंडूत 133 धावांची खेळी केली. यात 14 चौकार होते. शुभम शर्माने (Shubham Sharma) 215 चेंडूत 116 धावा फटकावल्या. यात 15 चौकार आणि 1 षटकार आहे. यश आणि शुभमने मध्य प्रदेशसाठी पाया रचला. शुभम शर्माला अवस्थीने हार्दिक तामोरेकरवी झेलबाद केलं. त्यावेळी मध्य प्रदेशची संख्या 269 होती. त्यानंतर यश दुबेच्या रुपाने तिसरी विकेट गेली. त्याला शम्स मुलानीने हार्दिक तामोरेकरवी झेलबाद केलं.
आज संपूर्ण दिवसभर मुंबईच्या गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. दिवसभरात फक्त दोन विकेट मिळाल्या. अनुभवी धवल कुलकर्णीसह मुंबईचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. काल मध्य प्रदेशचे सलामीवीर हिमांशु मंत्री (31) धावांवर तृषार देशपांडेने पायचीत पकडलं होतं. तिसऱ्यादिवस अखेर मध्य प्रदेशच्या तीन बाद 368 धावा झाल्या आहेत. मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून ते फक्त 6 धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचा संघ मुंबईवर आघाडी मिळवणार हे निश्चित आहे. फक्त ती आघाडी जास्त मोठी होणार नाही, यासाठी गोलंदाजांना आपलं कसब पणाला लावाव लागेल. पुन्हा एकदा रणजी विजेतेपदाचा मान मिळवण्यासाठी मुंबईला आपली कामगिरी उंचावावी लागेल. उद्या या सामन्याचा चौथा दिवस आहे. मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दिवसअखेर रजत पाटीदार नाबाद (67) आणि आदित्य श्रीवास्तव (11) धावांवर खेळतोय. रजत पाटीदारने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने एलिमिनेटरच्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शतकी खेळी साकारली होती. आजही त्याने अर्धशतकी खेळी केली. यावरुन तो फॉर्म मध्ये असल्याचं स्पष्ट होतं.