नवी दिल्ली: सध्या इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 6 दिवसांच्या आत त्याने द्विशतकानंतर शतक ठोकलं. 10 डिसेंबरला त्याने बांग्लादेशी गोलंदाजांना धुतलं होतं. क्रिकेट विश्वातील वेगवान द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. इशानने आता भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतलाय. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ज्याच्यासोबत स्पर्धा आहे, त्याच्याच टीम विरोधात इशानने शतक ठोकलं.
इशानच्या सेंच्युरीने चित्र बदललं
वनडे इंटरनॅशनलमध्ये इशानने मागच्या आठवड्यात शतक झळकावलं. त्यानंतर आता वेगळ्या पीचवर वेगळ्या फॉर्मेटमध्ये त्याने कमाल केलीय. इशानने आता रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावलं. इशान किशन मूळ झारखंडचा आहे. गुरुवारी 15 डिसेंबरला केरळ विरुद्ध खेळताना त्याने शतक ठोकलं. इशानच्या या शतकामुळे झारखंडने सामन्यात पुनरागमन केलं.
दोन लेफ्टींनी सावरला डाव
रांचीच्या घरच्या मैदानावर झारखंड विरुद्ध केरळ सामना सुरु आहे. झारखंडची टीम पिछाडीवर पडली होती. एका चांगल्या इनिंगची आवश्यकता होती. त्यावेळी अनुभवी सौरभ तिवारी आणि इशान किशनने ही कामगिरी पार पाडली. या दोन्ही लेफ्टी फलंदाजांनी 202 धावांची भागीदारी केली.
फर्स्ट क्लासमध्ये कितवं शतक?
इशानने केरळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फर्स्ट क्लास करिअरमधील त्याने सहावं शतक झळकावलं. इशानने केरळचा कॅप्टन सॅमसनचा प्रत्येक प्लान उधळून लावला. 195 चेंडूत 132 धावांची इनिंग खेळला. इशानने या दरम्यान 8 सिक्स आणि 9 चौकार मारले.
केरळकडे तरीही आघाडी
टीम इंडियात विकेटकीपर म्हणून स्थान मिळवण्यासाठी संजू सॅमसन आणि इशान किशनमध्ये स्पर्धा आहे. सध्याच्या राऊंडमध्ये इशानने बाजी मारलीय. इशानच्या इनिंगच्या बळावर झारखंडने पहिल्या डावात 340 धावा केल्या. पण तरीही केरळकडे 135 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये केरळने 1 विकेट गमावून 60 धावा केल्या. त्यांच्याकडे 195 धावांची आघाडी आहे.