मुंबई: भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा IPL 2022 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो चेन्नई सुपर किंग्ससाठी उर्वरित सामने खेळू शकणार नाहीय. रवींद्र जाडेजा खरोखरच दुखापतीमुळे बाहेर गेलाय की, अजून काही? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण CSK ने रवींद्र जाडेजाला (Ravindra jadeja) इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलय. त्याचवेळी तो दुखापतीमुळे खेळणार नाहीय, असं सुद्धा जाहीर करण्यात आलय. हा सर्वच घटनाक्रम संशयाला खतपाणी घालणारा आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु होण्याच्या दोन दिवस आधी रवींद्र जाडेजाला कॅप्टन बनवण्यात आलं. पण जाडेजाचं नेतृत्व कौशल्य दिसलच नाही. टीमने एकापोठाएक सलग सामने गमावले. त्यामुळे जाडेजाने स्वत:हून आठ सामन्यानंतर कॅप्टनशिप सोडली. त्याच्याजागी पुन्हा महेंद्रसिंह धोनीला कॅप्टन बनवण्यात आलं. रवींद्र जाडेजा आणि सीएसकेमध्ये काहीतरी बिनसल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर टीमचे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“सोशल मीडियावर काय चर्चा सुरु आहे, ते मला माहित नाही. पण चेन्नई सुपर किंग्सच्या भविष्याच्या योजनांमध्ये रवींद्र जाडेजा CSK चा भाग राहिलं” असं सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. रवींद्र जाडेजाला ज्या पद्धतीने सीएसकेच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं, त्याला सोशल मीडियावर अनफॉलो करण्यात आलं, यावरुन काशी विश्वनाथ यांच्या स्रष्टीकरणावर कितपत विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे. सुरेश रैना बरोबरही असंच काहीतरी झालं होतं. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याच्यावर बोली लावली नव्हती. खराब फॉर्ममुळे रैनाला विकत घेतलं नाही, असं सीएसकेच्या सीईओंनी सांगितलं होतं.
रवींद्र जाडेजाला चेन्नई सुपर किंग्सने 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. जाडेजाने 10 सामन्यात 19.33 च्या सरासरीने फक्त 116 धावा केल्या. त्याने पाच विकेट घेतल्या. फिल्डिंग करतानाही अनेक झेल सोडले. जे आधी सुरेश रैना बरोबर घडलं होतं, तेच आता रवींद्र जाडेजा बरोबर होतय. त्यामुळे पुढच्या सीजनमध्ये जाडेजा सीएसकेमधून खेळताना दिसेल का? या बद्दल प्रश्नच आहे.