मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे 3 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मेहनत घेऊन जाडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) टी-20 मालिकेत संघात पुनरागमन केलं. या मालिकेतील त्याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. या मालिकेतील रवींद्र जाडेजाला फलंदाज म्हणून लोक ओळखू लागले आहेत. रवींद्र जाडेजा, जो आधी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात होता, जो 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, जो डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि जो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाचा नवा अवतार पाहायला मिळाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रवींद्र जडेजाची परीक्षा घेतली आणि या खेळाडूने आपण बावनकशी सोनं असल्याचं सिद्ध केलं.
रवींद्र जाडेजासाठी श्रीलंकेविरुद्धची मालिका हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन होते. जडेजा दुखापतीमुळे 3 महिने क्रिकेट खेळला नाही, पण जेव्हा तो परतला तेव्हा जग थक्क झाले. जाडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 3 डावात 70 धावा केल्या आणि तो एकदाही बाद झाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मालिकेत जडेजाने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि सर्व चाहत्यांना एक वेगळाच जड्डू पाहायला मिळाला.
श्रीलंकेविरुद्धच्या जाडेजाच्या कामगिरीनंतर अनेकजण त्याचे चाहते झाले आहेत. त्यात सर्वात आघाडीवर आहे तो यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक. जाडेजाप्रमाणे कोणत्याही खेळाडूने आपल्या खेळात इतकी सुधारणा केलेली नाही, असे दिनेश कार्तिकला वाटते. कार्तिक म्हणाला, “2019 च्या विश्वचषकानंतर जर एखादा क्रिकेटपटू सर्वात जास्त सुधारला असेल तर तो रवींद्र जाडेजा आहे. मला वाटतं जाडेजाने आता आयपीएलमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्याने श्रीलंका मालिकेतही आपण परफेक्ट बॅटर (फलंदाज) असल्याचे दाखवून दिले आहे. आता जाडेजाची प्रतिस्पर्ध्यांना भीती आहे की, तो केव्हाही क्रीझवर येऊन सामन्याचे चित्र फिरवू शकतो. गेल्या आयपीएल मोसमातही त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईसाठी काही सामने जिंकले होते. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याच्याशिवाय टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणार नाही.”
रवींद्र जाडेजाची फलंदाजी पाहून माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि दिनेश कार्तिक यांनी या अष्टपैलू खेळाडूला सलाम केला. झहीर खानने क्रिकबझसोबतच्या संभाषणात सांगितले की, “जेव्हा रवींद्र जाडेजा टीम इंडियात आला तेव्हा तो अष्टपैलू खेळाडू नव्हता. पण एक चांगला अष्टपैलू खेळाडू होण्याचे गुण त्याच्यात नक्कीच होते. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही त्याची सर्वात मजबूत बाजू होती. पण गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या फलंदाजीत केलेली सुधारणा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. जाडेजाने त्याच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहिले तर त्याला स्वतःचा अभिमान वाटेल. त्याने त्याच्या खेळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. हे सर्व त्याच्या मेहनतीचं फळ आहे.”
रवींद्र जडेजा लखनौ T20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, मात्र या सामन्यात त्याल फक्त 4 चेंडू खेळण्याची संधी मिळाली. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 184 धावांचे लक्ष्य गाठायचे होते तेव्हा जडेजाची खरी प्रतिभा पाहायला मिळाली. या सामन्यात जाडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो क्रीझवर येताच त्याने धुमाकूळ घातला. जाडेजाने अवघ्या 18 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा चोपल्या. जाडेजाची ही फलंदाजी खूप खास होती, कारण या डावात त्याने एकही जोखमीचा शॉट खेळला नव्हता आणि सामना संपवून तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या T20 मध्ये, जडेजा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने पुन्हा एकदा 15 चेंडूत नाबाद 22 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
इतर बातम्या
IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO
IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट