टीम इंडियासाठी Good News, एक मोठा खेळाडू पुनरागमनासाठी फिट तर दुसरा जाणार बाहेर

| Updated on: Feb 18, 2022 | 5:14 PM

टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे.

टीम इंडियासाठी Good News, एक मोठा खेळाडू पुनरागमनासाठी फिट तर दुसरा जाणार बाहेर
Follow us on

मुंबई: टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. भारताचा प्रमुख ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) पूर्णपणे फिट आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश होऊ शकतो. नोव्हेंबर 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील (India vs Newzeland) कानपूर येथे पहिला कसोटी सामना झाला. त्यानंतर दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेरच होता. पुढच्या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध (India vs Srilanka) होणाऱ्या दोन कसोटी सामन्यात त्याचा संघात समावेश होऊ शकतो. सर्वकाही सुरळीत झालं, तर कसोटी मालिकेआधी श्रीलंके विरुद्धच होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतही त्याचा समावेश होईल. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रवींद्र जाडेजा त्याच्या फिटनेसवर मेहनत घेत होता. त्याच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु होती. क्रिकबझच्या वृत्तानुसार, रवींद्र जाडेजा आधीच लखनऊ येथे दाखल झाला आहे.

येत्या 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये रवींद्र जाडेजा क्वारंटाइन झाला आहे. त्याची कोविड चाचणी झाली आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्याचा भारताच्या टी 20 संघात समावेश होऊ शकतो.

जसप्रीत बुमराह करणार पुनरागमन

रवींद्र जाडेजा सोबत जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करु शकतो. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत दोघे वेगवेगळ्या कारणांसाठी संघाबाहेर आहेत. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजासह जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 26 जानेवारीला सांगितलं होतं.

विराट कोहलीला विश्रांती देणार?

श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी माजी कर्णधार विराट कोहलीला ब्रेक देण्यात येऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांमध्ये कदाचित विराट कोहली खेळताना दिसणार नाही. कसोटी मालिकेत विराट कोहलीचं खेळणं निश्चित आहे. विराट कोहली मोहालीमध्ये आपला 100 वा कसोटी सामना खेळू शकतो.

रोहित शर्मा पुढचा कसोटी कर्णधार?

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियासाठी नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. रोहित शर्मालाच कसोटी कर्णधार बनवलं जाऊ शकतं. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं होतं.

Ravindra Jadeja set for India return Virat Kohli may skip Sri lanka T20I series