मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. इंग्लंड दौऱ्यावरही विराट कोहलीला विशेष प्रभाव पाडता आला नाही. आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला आराम दिलाय. विराट कोहलीचं सध्याचं प्रदर्शन लक्षात घेता, यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) मधील संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky ponting) विराट कोहलीच्या भविष्याबद्दल एक मोठं विधान केलय. “विराट कोहलीला वर्ल्ड कपच्या संघातून वगळलं. त्याच्याजागी संघात येणाऱ्या खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं, तर कोहलीचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग अजून खडतर होईल” असं पाँटिंग म्हणाला. आयसीसी रिव्यू मध्ये जसप्रीत बुमराह आणि टीव्ही प्रेजेंटर संजना गणेशन सोबत चर्चा सत्राच्या कार्यक्रमात तो सहभागी झाला होता.
‘मी असतो, तर कोहलीला भरपूर संधी दिल्या असत्या’, असं पाँटिंग म्हणाला. “कोहलीला त्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळाला, तर त्याच्या इतका दुसरा सर्वोत्तम खेळाडू नाहीय. मी टीम इंडियाचा कॅप्टन किंवा कोच असतो, तर कोहलीसाठी शक्य तितक्या गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केला असता. त्याने धावा बनवण्याची वाट पाहिली असती. निवड समितीने कोहलीला टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर मध्ये संधी दिली पाहिजे. त्याला कमीत कमी टी 20 वर्ल्ड कप मध्ये संधी मिळालीच पाहिजे” असं पाँटिंग म्हणाला.
“नॉकआउट स्टेज मध्ये विराट कोहली सर्वोत्तम प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा आहे” असं माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला. स्पर्धा सुरु होत असताना, कोहलीसाठी धावा बनवणं थोडं कठीण असेल कदाचित, पण स्पर्धा संपताना, तो त्याच्या फॉर्म मध्ये परतलेला असेल, असं पाँटिंग यांचं मत आहे. कोहलीला त्याचा आत्मविश्वास परत कसा मिळेल? यासाठी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफने मेहनत केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. इंग्लंड दौऱ्यात कोहलीने एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावात अनुक्रमे 11 आणि 20, दोन टी 20 सामन्यात 1 आणि 11 आणि दोन वनडेत अनुक्रमे 16,17 धावा केल्या.