देहरादून : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला आज पहाटे अपघात ( Rishabh Pant Car Accident ) झाला. 30 डिसेंबरच्या पहाटे उत्तराखंडमधील रुरकी येथे जात असताना ऋषभ पंतच्या ( Rishabh Pant car ) कारला अपघात झाला. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात तो बचावला. कारण गाडीला अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. पण त्याआधीच तो गाडीतून बाहेर पडला होता.
ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून कारमधून बाहेर पडला. अपघात झालेला पाहून काही लोकं घटनास्थळी धावले. यानंतर 108 नंबरवर कॉल करुन तातडीने त्याला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
ऋषभ पंतचे चाहते ( Rishabh Pant Fans ) तो लवकर यातून बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. त्याच्या अपघाताची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा रात्री प्रवास करणं किती धोकादायक असू शकतं हे पुढे आलं आहे.
रात्रीच्या वेळी गाडी चालवणं टाळलं पाहिजे. कारण ही वेळ खूप महत्त्वाची असते. यावेळी कितीही झालं तरी व्यक्तीला झोप आवरणं शक्य होत नाही. पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींनी देखील जीव गमवला आहे.
ऋषभ पंत देखील रात्रीच्या वेळी प्रवास करत होता. त्याने प्रवासासाठी ही वेळ निवडली. इथे त्याची ही पहिली चूक झाली. त्याला लांब प्रवास करायचा होता. तर त्याने सोबत एक ड्राईव्हर ठेवला पाहिजे होता. पण तो स्वत: गाडी घेऊन एकटाच निघाला होता. इथे त्याची दुसरी चूक झाली.