मुंबई: टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत यांचा अपघात झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. पंतच्या तब्येतीची प्रत्येक्ष क्षणाची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या चाहत्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांनी थेट बीसीसीआयच्या कार्यालयात फोनवर फोन करून पंतच्या तब्येतीची चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी तर थेट बीसीसीआयचं कार्यालयच गाठलं आहे. त्यामुळे या चाहत्यांना उत्तरं देताना बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
ऋषभ पंतचे चाहते त्याच्या अपघाताशी संबंधित प्रत्येक बातमी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील प्रत्येक बातमी, मेसेज वाचून ते पुढे फॉरवर्ड केले जात आहेत. त्याच्या अपघाताचा व्हिडीओही वेगाने व्हायरल केला जात आहे.
काही चाहत्यांनी तर मुंबईतल्या बीसीसीआयच्या कार्यालयाच फोन लावून विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या कार्यालयाची घंटी सारखी खणाणताना दिसत आहे. हॅलो, पंत कसा आहे? त्याची तब्येत बरी आहे ना? तो टीम इंडियात खेळणार ना? तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार ना? असे सवाल या चाहत्यांकडून केले जात आहेत. काही चाहते तर थेट बीसीसीआयच्या कार्यालयाबाहेरच जमा झाले आहे.
केवळ देशातूनच नव्हे तर विदेशातूनही पंतच्या चाहत्याचे बीसीसीआयच्या कार्यालयात फोन येत आहेत. त्याच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली जात आहे. फोन करणारे आणि कार्यालयाबाहेर ठाण मांडलेले लोक एकच सवाल करताना दिसत आहेत, तो म्हणजे पंत कधीपर्यंत बरा होणार? तो ऑस्ट्रेलियात होणारी टेस्ट सीरिज खेळणार आहे का? हेच सवाल बीसीसीआयला केले जात आहेत.
बीसीसीआयच्या कार्यालयाबाहेर जमलेले काही चाहते तर पंतचं मेडिकल बुलेटिन मागत आहेत. काही चाहत्यांना पंतला भेटायचं आहे. त्यामुळे ते पंतला कोणत्या रुग्णालयात दाखल केलं याची माहिती मागत आहेत.
ऋषभ पंतचा काल पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातून सुदैवाने तो बचावला. पण त्याच्या शरीराला प्रचंड जखमा झाला आहे. त्याच्या चेहरा आणि पाठीची प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली आहे. त्याच्यावर सध्या डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.