IND vs NZ: प्रत्येकवेळी ऋषभ पंत IN आणि संजू सॅमसन OUT, असं का होतं? त्यामागे ‘ही’ पाच कारणं

| Updated on: Nov 29, 2022 | 7:48 PM

IND vs NZ: टीम मॅनेजमेंटची अशी काय मजबुरी आहे, की ऋषभ पंतला खेळवावं लागतं.

IND vs NZ: प्रत्येकवेळी ऋषभ पंत IN आणि संजू सॅमसन OUT, असं का होतं? त्यामागे ही पाच कारणं
Rishabh pant
Image Credit source: PTI
Follow us on

ख्राइस्टचर्च: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळत आहे. या सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याआधी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्येही संजूला संधी मिळाली नाही. सिलेक्टर्सनी संजूला तितकी संधी दिलेली नाही, जितकी ऋषभ पंतला मिळालीय.

आधी तर संजूची टीममध्ये निवड होत नव्हती आणि आता निवड झाली, तर प्लेइंग 11 मध्ये संधी मिळत नाही. संजू सॅमसनच्या जागी कोच आणि कॅप्टन दोघेही नेहमी ऋषभ पंतला प्राधान्य देतात. संजू सॅमसनने वनडेमध्ये चांगलं प्रदर्शन केलय. मात्र तरीही त्याला बाहेस बसवलं जातं. सॅमसनच्या जागी पंतला का संधी मिळते? ती कारणं जाणून घेऊया.

संधी मिळण्यासाठी कसोटी क्रिकेट एक कारण….

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टेस्ट फॉर्मेटमध्ये ऋषभ पंतने कमालीच प्रदर्शन केलय. या डावखुऱ्या फलंदाजाने 31 कसोटी सामन्यात 5 शतकं झळकावली आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 2123 धावा आहेत. पंतने ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये शतकं झळकावली आहेत. त्याने टेस्ट फॉर्मेटमध्ये अशा इनिंग खेळल्या आहेत, ज्याला सहज विसरता येणार नाही. टेस्टमधील चांगल्या प्रदर्शनामुळे पंतला वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये जास्त संधी मिळतात.

लेफ्टी असण्याचा मिळतो फायदा

भारतीय बॅटिंग ऑर्डरमद्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव राइट हँड बटिंग करतात. लेफ्टी बॅट्समन सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे कॅप्टन-कोच कॉम्बिनेशनचा विचार करतात. त्यातून ऋषभ पंतला संधी निर्माण होते. तो लेफ्टी बॅटिंग करतो. रायटी आणि लेफ्टी बॅट्समन क्रीजवर असताना, गोलंदाजांना बॉलिंग करताना अडचणी येतात, असा टीम मॅनेजमेंटचा विचार असतो.

स्फोटक फलंदाजीत माहीर

ऋषभ पंतने 2017 साली भारतीय टीममध्ये डेब्यु केला. स्फोटक फलंदाज म्हणून त्याने स्वत:ची ओळख बनवली. पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हे सिद्ध केलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध गाबा कसोटीत तो 89 धावांची इनिंग खेळला. आपल्या बळावर त्याने टीम इंडियाला कसोटीत विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही वनडे सीरीजमध्ये त्याने शतक झळकावलं. संधी मिळाली, तेव्हा पंतने आक्रमक बॅटिंग केली. कठीण परिस्थितीत त्याने टीमचा डाव सावरला. दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने 2015 साली टीम इंडियाकडून डेब्यु केला. पण कामगिरीत सातत्याचा अभाव होता. त्यामुळे तो टीममध्ये आपलं स्थान पक्क करु शकला नाही.

पंतला एक्स फॅक्टर समजतात

परिस्थिती कशीही असली, तरी ऋषभ पंतने आक्रमक बॅटिंगशी अजिबात तडजोड केली नाही. क्रीजवर आल्यानंतर संधी मिळेल, तेव्हा तो फटकेबाजी करतो. विकेट संभाळून खेळत नाही. या बॅटिंगमुळे धावफलक वेगाने पुढे सरकत राहतो. गोलंदाजाची लय बिघडते. टीमवरील दबाव कमी होतो. त्यामुळे पंतला एक्स फॅक्टर मानतात.

पंतची विकेटकीपिंग स्किल्स सॅमसनपेक्षा चांगली

ऋषभ पंत क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम विकेटकीपर नाही. पण त्याने आपल्या विकेटकीपिंग कौशल्यामध्ये सुधारणा केलीय. ऋद्निमान साहाच्या जागी अनेकदा पंतला संधी दिलीय. त्यावेळी त्याच्या विकेटकीपिंग कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. त्यानंतर त्याने आपल्या विकेटकीपिंगवर मेहनत केली. संजू सॅमसनच्या तुलनेत पंत चांगला विकेटकीपर आहे.