IND vs ENG: Rishabh Pant रवींद्र जाडेजाच्या साथीने लढला, झळकवलं शानदार शतक

| Updated on: Jul 01, 2022 | 11:01 PM

IND vs ENG: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) एजबॅस्टन कसोटीत इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) शानदार शतक झळकावलं आहे.

IND vs ENG: Rishabh Pant रवींद्र जाडेजाच्या साथीने लढला, झळकवलं शानदार शतक
rishabh-pant
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) एजबॅस्टन कसोटीत इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) शानदार शतक झळकावलं आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतने फक्त शतक झळकवून रेकॉर्डच केला नाही, तर अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढलं. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल अपयशी ठरले होते. भारताची टॉप ऑर्डर कोसळली होती. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली होती. त्या ठिकाणी पंत आणि रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) उभे राहिले आणि दोघे लढले. ऋषभ पंतने नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये फलंदाजी केली. कसोटी सामना असला, तरी ऋषभ पंत वनडे सारखा खेळला. त्याने 89 चेंडूत शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधील त्याच हे पाचव शतक आहे. दुसऱ्याबाजूने रवींद्र जाडेजाने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.

दोघांनी किल्ला लढवला

ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाच्या खेळाच कौतुक करावं तेवढं कमी आहे. 98 धावात भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. भारताच्या पाच विकेट गेल्या होत्या. तिथून दोघांनी डाव सावरला. भारताचा डाव लवकर आटोपतो की, काय अशी शंका निर्माण झाली होती. तिथून दोघांनी किल्ला लढवला. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला.  टी ब्रेकला पंतने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सत्रात ऋषभने आपल्या खेळाचा गेयर बदलला. इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने पुढच्या एक तासात शतक झळकावलं. आक्रमक फलंदाजी करणारा ऋषभ पंत अखेर 146 धावांवर आऊट झाला. त्याने 111 चेंडूत या धावा केल्या. यात 19 चौकार आणि 4 षटकार आहेत. ज्यो रुटच्या गोलंदाजीवर त्याने क्रॉलीकडे झेल दिला.

मॅथ्यू पॉट्सला धुतलं

जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्स दोघांनी मिळून पाच विकेट घेतल्या होत्या. ऋषभ पंतने खासकरुन पॉट्सला लक्ष्य केलं. त्याची चांगलीच धुलाई केली. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या गोलंदाजीवर सुद्धा पंतने असाच खेळ दाखवला. स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन त्याने शतक पूर्ण केलं.ऋषभने 89 चेंडूत पाचव शतक झळकावलं. कुठल्याही भारतीय विकेटकीपरने झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक आहे. पंतच इंग्लंडविरुद्ध हे तिसर शतक आहे. पाच पैकी चार शतकं त्याने परदेशात झळकावली आहेत.