मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध झाला. या मॅचच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंतला संधी मिळाली नव्हती. त्यावरुन बरीच चर्चा झाली. ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाची पहिली पसंत आहे, असा एक समज होता. कारण तो वनडे, टेस्ट आणि टी 20 तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळतो. त्यामुळे त्याला वगळल्यानंतर प्रश्न विचारलं जाणं, स्वाभाविक होतं. पण आता टी 20 फॉर्मेट मध्ये ऋषभ पंतच डिमोशन झाल्याचं दिसतय.
पाकिस्तान विरुद्ध 4 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारतीय संघ मैदानात उतरेल. या सामन्याआधी हेड कोच राहुल द्रविड यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. टी 20 क्रिकेट मध्ये ऋषभ पंतला पहिली पसंती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंत शिवाय भारतीय संघात दिनेश कार्तिकच्या रुपात सीनियर विकेटकीपर उपलब्ध आहे. आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात तो संघाचा भाग होता.
“संघामध्ये कोणीही पहिल्या पसंतीचा विकेटकीपर नाहीय. आम्ही परिस्थिती, मैदानावरची स्थिती आणि प्रतिस्पर्धी कोण आहे? त्यानुसार खेळतो. सामन्यानुसारच प्लेइंग इलेव्हन निवडली जाते” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.
“प्रत्येक स्थितीसाठी पहिल्या पसंतीची अशी प्लेइंग इलेव्हन नसते. परिस्थिती, गरजेनुसार त्यात बदल होतील. त्यादिवशी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावेळी दिनेश कार्तिक योग्य पर्याय आहे, असं आम्हाला वाटलं” असं राहुल द्रविड म्हणाले.
टेस्ट आणि वनडे मध्ये ऋषभ पंतने संघात आपली जागा पक्की केली आहे. पहिली पसंती त्यालाच आहे. पण टी 20 फॉर्मेट मध्ये दिनेश कार्तिकच्या पुनरागमनाने त्याच्या अडचणी वाढवल्या आहेत. विशेष करुन या फॉर्मेट मध्ये आकड्यांची साथही ऋषभ पंतला नाहीय. 2022 मध्ये पंतने 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 260 धावाच केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे. पण स्ट्राइक रेट 135 चा आहे.